बसस्थानकांची दयनीय अवस्था; व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवा : सुदीप ताम्हणकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
बसस्थानकांची दयनीय अवस्था; व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवा : सुदीप ताम्हणकर

म्हापसा : पणजी आणि म्हापसा बसस्थानकांची ((Panjim, Mapusa Bus stand)  दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  या स्थितीला जबाबदार धरून कदंब परिवहन महामंडळाचे (KTC) व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.  यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी आज शनिवारी म्हापसा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

 गेल्या अनेक महिन्यांपासून बसस्थानकांवरील रस्ते उखडले असून; तिथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून 'स्प्रिंग लीफ' सारखे महागडे सुटे भाग वारंवार बदलावे लागत आहेत. खड्ड्यांमुळे बसमधील प्रवासी, विशेषतः गरोदर स्त्रिया आणि पर्यटकांना शारीरिक हाल सोसावे लागत असल्याचे ताम्हणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

वारंवार स्मरणपत्रे देऊनही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. बसस्थानकांवरील सोकपिट्स तुडुंब भरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीआय मधून मिळालेल्या माहितीनुसार महामंडळ भाडे आणि टोल मधून मोठा महसूल गोळा करते, तरीही सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कासकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही केवळ पोकळ आश्वासने दिली, असा दावा ताम्हणकर यांनी केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

हेही वाचा