पहाटे लागलेल्या आगीत मडगाव न्यू मार्केटमधील दोन दुकाने जळून खाक; लाखोंची हानी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th April, 09:36 am
पहाटे लागलेल्या आगीत मडगाव न्यू मार्केटमधील दोन दुकाने जळून खाक; लाखोंची हानी

मडगाव : मडगाव येथील न्यू मार्केटमधील दोन दुकानांना शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत ही दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे २:३० वाजता न्यू मार्केटमधील दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा येत असल्याचे सोपो कर गोळा करणाऱ्या सनी नामक व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ इतर दुकानदारांना तसेच मडगाव अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. छतावरील पत्रे काढूनही आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला, ज्यामुळे आग आजूबाजूच्या इतर दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

या आगीत दामोदर बोरकर यांचे ज्यूस शॉप व कासिम शेख यांचे टेलरिंग दुकान या दोन दुकानांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, 'शॉर्ट सर्किट'मुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज संबंधित दुकानदारांनी व्यक्त केला आहे. ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने बाजारपेठेत गर्दी नव्हती, ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीत दोन्ही दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी सांगितले की, अग्निशमन दलाने वेळेत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. मार्केटमध्ये 'फायर हायड्रंट' उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून त्यांची जोडणी लवकरच दिली जाईल. यामुळे भविष्यात आगीच्या घटना घडल्यास अधिक सुरक्षितता मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.