काटे-बायणा येथील दुर्दैवी घटना

पणजी : मुरगाव तालुक्यातील काटे-बायणा येथे एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उंचावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घराची दुरुस्ती किंवा साफसफाईचे काम करत असताना हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अँथनी पीटर रॉड्रिग्ज असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे काटे-बायणा येथील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुरगाव पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेले माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास मडगाव पोलीस नियंत्रण कक्षाकडून (PCR) मुरगाव पोलिसांना मोगा बाई परिसरातील एक व्यक्ती उंचावरून पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, अँथनी रॉड्रिग्ज हे त्यांच्या घराच्या डाव्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्याच्या मागील भागातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यांना तातडीने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अँथनी हे घरात एकटेच राहत होते आणि ते सुतारकाम, रंगकाम, छताची दुरुस्ती आणि फरशी बसवण्यासारखी घरातील सर्व कामे स्वतःच करत असत. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घरातील भाडेकरूचा मुलगा व्हरांड्यात खेळत असताना त्याला अँथनी घराच्या बाजूला बेशुद्ध पडलेले दिसले. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. अँथनी हे छतावर दुरुस्ती किंवा साफसफाईचे काही काम करत असताना त्यांचा तोल गेल्याने ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुरगाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. अँथनी यांची बहीण अर्जेंटिना रॉड्रिग्ज आणि भाडेकरूंच्या जबानीवरून पोलीस अधिक तपास करत आहेत. मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीस यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक साईदत्त नाईक पुढील तपास करत आहेत. एकंदरीत घटनेमुळे एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.