हणजूण येथे पार्टीनंतर मध्यप्रदेशातील २१ वर्षीय युवकाचा मृत्यू; ‘ओव्हर डोस’चा संशय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
04th April, 11:57 am
हणजूण येथे पार्टीनंतर मध्यप्रदेशातील २१ वर्षीय युवकाचा मृत्यू; ‘ओव्हर डोस’चा संशय

पणजी : गोव्यातील (Goa) हणजूण (Anjuna)  येथे काल उशिरा रात्री झालेल्या एका पार्टीदरम्यान २१ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत युवक हा इंदोर, मध्यप्रदेश (Indore, Madhya Pradesh)  येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्टीदरम्यान अचानक तब्येत बिघडल्याने संबंधित युवकाला त्याच्या मित्रांनी दोन ते तीन खासगी इस्पीतळात (Private Hospital)  दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सदर इस्पीतळात दाखल करून घेतले नाही. नंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा मृत्यू संशयास्पद मानला जात असून;  ओव्हर डोसमुळे (Over Dose)  मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.