मायना-कुडतरी पोलिसांकडून संशयिताला अटक

मडगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना मायना-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित यशवंत यल्लप्पा हरिजन (वय २६, रा. रुमडामळ हाउसिंग बोर्ड, मूळ बेळगाव-कर्नाटक) याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित यशवंत हरिजन याने पीडित मुलीशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून १० ऑगस्ट २०२५ ते ३ मार्च २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी फिरायला नेले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मायना-कुडतरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लग्नाचे खोटे आश्वासन देणे आणि फसवणुकीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून संशयिताला रितसर अटक केली आहे. मायना-कुडतरी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनल गावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.