हरमल येथे अग्न‌ितांडव; ६ रेस्टॉरंट्स आगीच्या भक्ष्यस्थानी

सुमारे २० लाखांचे नुसकान; व्यवसायिकांवर ऐन हंगामात ओढवले मोठे संकट.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
हरमल येथे अग्न‌ितांडव; ६  रेस्टॉरंट्स आगीच्या भक्ष्यस्थानी

 हरमल : खालचावाडा, हरमल (Harmal), पेडणे (Pernem) येथे ऐन पर्यटन हंगामात समुद्र किनाऱ्याजवळील खासगी जमिनीतील सहा रेस्टॉरंट्स आगीत भस्मसात झाली.  या आगीत (Fire) व्यावसायिकांना जबर फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवतला जात आहे. 

अग्निशमन दलाचे (Fire brigade) बंब रेतीत अडकून पडल्याने, आग विझवण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. अग्न‌िशमन दल, पोलीस (Police)  व  स्थानिकांनी अपार मेहनत घेऊन आग आटोक्यात आणली. शार्टसर्कीटमुळे ही आग लागली. शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास वीज खांबावर आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर रेस्टॉरंटना आग लागली.

आग लागल्याचे दिसताच याठिकाणी असलेल्यांनी रेस्टॉरंट मालकांना माहिती दिली व किंमती सामान बाहेर काढण्यास मदत केली. मात्र; वाऱ्याच्या झोताने आगीने प्रखर रूप धारण केले व आग सर्वत्र पसरली. त्यात सहा रेस्टॉरंट जळाली. त्याचा फटका रेस्टॉरंट मालकांना बसल्याचे हरेश मयेकर यांनी सांगितले. आग लागली तेव्हा सर्व रेस्टॉरंट बंद होती. त्यामुळे मोठा धोका टळला. 

गॅस सिलिंडर नसल्याने नुकसान आटोक्यात

 सध्या, अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यावसायिक सिल‌िंडरची कमतरता आहे. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये गॅस सिलिंडर नव्हते. सिलिंडर असते तर स्फोट होऊन आग जास्त भडकली असती व मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. मोठे नुकसान झाले असते. मात्र, गॅस सिलिंडर नसल्याने नुकसानीचा आकडा वाढला नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

अग्न‌िशमन दलाची गाडी रेतीत रुतली

आग लागल्याची माहिती मिळताच पाण्याचे बंब घेऊन येणारी पेडणे अग्निशमन दलाची गाडी रेतीत रुतून पडली. त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला.  अग्नीशमन दलाचे जवान, याठिकाणी असलेले पोलीस व स्थानिकांनी पाणी मारून आग विझवण्यात सहकार्य केल्याचे मयेकर यांनी सांगितले.

आग एवढी भीषण होती की,  परिसरात असलेले अंदाजे वीस मीटर उंचीचे माड व झाडे आगीत जळाली. आगीत काही पक्क्या जुन्या बांधकामांची दारे, खिडक्या व तावदाने आगीत जळून गेली. 

आमदार जीतचे आग विझवण्यात सहकार्य 

आगीच्या घटनेची माहिती स्थानिक जॉकी रॉड्रिग्ज यांनी आमदार जीत आरोलकर यांना देताच त्यांनी लगेच घटनास्थळी येऊन आग विझवण्यात सहकार्य केले.  त्याबद्दल हरेश मयेकर व स्थानिक नागरिकांनी आमदार जीत आरोलकर यांचे आभार व्यक्त केले. 

आग विझवण्यासाठी स्थानिक एकवटले 

आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन आग विझवण्यात सहकार्य केले. पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार व इतर जवानांनी आग विझवली. मांद्रे पोलिसांनीही सहकार्य केले.




 

पहाटे ३:२० च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती स्थानिक आमदारांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार अवघ्या १५ मिनिटांत म्हणजे ३:३५ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य वेगवान केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही या दुर्घटनेची कल्पना दिली. स्थानिक नागरिक, आमदार आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. 


 

या आगीत शॅकमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वतीने आता आगीच्या कारणाचा सखोल तपास केला जात आहे.




हेही वाचा