
मडगाव : नावेली येथील चर्चच्या मागील बाजूच्या आके-बायशकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले आहे. भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामावेळी हा प्रकार घडला असून, 'गोवा कॅन'ने ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
नावेली चर्चच्या मागील आके-बायशकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावेळी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा मुख्य जलवाहिनी फुटली आणि पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी झाली. 'नावेली सिव्हिक अँड कन्झ्युमर फोरम'ने ही बाब उघडकीस आणली आहे. ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी होणे अत्यंत चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याप्रकरणी 'गोवा कॅन' संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पाणी पुरवठा) मुख्य अभियंता व्ही. जे. भेंडे यांना या घटनेची सविस्तर माहिती देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामावेळी वारंवार होणाऱ्या चुकांमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याने, संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना जलवाहिन्या फुटल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे अशा कामांच्या वेळी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याची गरज असल्याचे 'गोवा कॅन'ने नमूद केले आहे.