रॅली, सभांसह मद्यविक्रीवर उद्या मंगळवारी सायंकाळपासून निर्बंध

फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
54 mins ago
रॅली, सभांसह मद्यविक्रीवर उद्या मंगळवारी सायंकाळपासून निर्बंध

मडगाव: फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस (आयएएस) यांनी विविध निर्बंधांबाबतचा आदेश जारी केला आहे. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपासून मतदारसंघात पुढील ४८ तास रॅली, सभा घेण्यासह मद्यविक्रीवर निर्बंध असतील.

निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जाहीर सभा, मिरवणुका, कोपरा सभा किंवा रॅली काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या ४८ तासांच्या कालावधीत निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा (Loudspeaker) वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

तसेच, ७ एप्रिल सायंकाळी ६ वाजेपासून ते ९ एप्रिल रोजी मतदान संपेपर्यंत सर्व मद्यविक्रीची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. मतमोजणीच्या दिवशी, म्हणजेच ४ मे रोजी देखील 'ड्राय डे' पाळला जाणार आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी असेल; केवळ मतदानासाठी रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांनाच या परिसरात परवानगी दिली जाईल. रोख रक्कम, भेटवस्तू किंवा मद्य वाटप रोखण्यासाठी पोलीस दलातर्फे वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे.

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक आणि फोंडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.