‘विकसित भारत २०४७’पूर्वी ‘विकसित गोवा’चे ध्येय गाठणार!

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री फडणवीस : फोंड्यातील जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 mins ago
‘विकसित भारत २०४७’पूर्वी ‘विकसित गोवा’चे ध्येय गाठणार!

फोंडा येथे प्रचारसभेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

फोंडा : भारताच्या डबल इंजिन सरकारने गोव्यात झपाट्याने विकास केला आहे. जगात सुरू असलेल्या युद्धमुळे अर्थव्यवस्थेत बदल झाला आहे. तरी सुरू असलेले युद्ध बंद करण्यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थी करण्यात सक्षम आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी ‘२०४७ विकसित भारत’ निर्माण तयार करण्याचा प्रयत्न करीत असून त्यापूर्वी ‘२०३७ गोवा विकसित’ राज्य करण्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यशस्वी ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
फोंडा येथे भाजप उमेदवार रितेश नाईक यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या सभेला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, खासदार सदानंद तानावडे, आमदार गोविंद गावडे, आमदार मायकल लोबो, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह फोंडा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि भाजप-मगो युतीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोव्याचे भाजप सरकार राज्य शैक्षणिक हब तयार करून आधुनिक पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. फोंडा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार रितेश नाईक यांना विजयी करून मतदार स्व. रवी नाईक यांची परंपरा टिकवून ठेवण्यात मदत करणार आहे. गोव्यात २०२७ पर्यंत आणि त्यानंतर भाजप-मगोचे युती सरकार अस्तित्वात राहणार असल्याचे सांगितले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही निवडणूक भावनिक असल्याचे सांगितले. स्व. रवी नाईक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून, इतर पक्षांनी रितेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य करायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
व्यंकटेश उर्फ दादा नाईक, जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार गोविंद गावडे, आमदार मायकल लोबो, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व इतरांनी आपले विचार व्यक्त केले.
फर्मागुडीत आयआयटी, गृह आधार निधीत वाढ
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. गोव्यासाठी आवश्यक असलेला आयआयटी प्रकल्प फर्मागुडी येथेच सुरू केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील महिलांसाठी असलेल्या गृह आधार योजनेच्या निधीत लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी रितेश नाईक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.