शवचिकित्सा अहवालानंतर पोलिसांकडून हत्येचा गुन्हा नोंद

म्हापसा : मार्ना शिवोली येथे मृतावस्थेत सापडलेले सुशांत पालयेकर (५३, रा. दांडा शिवोली) यांचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी ६ रोजी दुपारी पालयेकर यांच्या मृतदेहावर गोवा वैद्यकिय इस्पितळात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा मृत्यू हा श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्याने गुदमरून झाल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यांच्या अंगावर जरी खोलवर जखमा नसल्या तरीही त्यांना गळा आवळून ठार मारण्यात आले असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, असे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात नमूद केलेले आहे.
त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजित कांदोळकर हे वरीष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. दरम्यान, रविवारी ५ रोजी दुपारी पालयेकर यांचा मृतदेह हा कॉस्तावाडा, शिवोली येथील भाटातील एका आंब्याच्या झाडाजवळ आढळला होता. सदर भाटामध्ये पालयेकर हे सुरक्षारक्षक म्हणून सेवा बजावत होते. घटनास्थळी पोलिसांना पिशवीमध्ये आंबे सापडले होते. रहिवाशांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. नंतर हणजूण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवला होता.