पीओपी मूर्तींचे प्रमाण अधिक असल्यास २५ हजारांचा दंड

पणजी : यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळा आणि मूर्ती विक्रेत्यांना आता गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरण खात्याच्या संचालकांनी हा आदेश जारी केला असून, मूर्तींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
पीओपीच्या वापरासाठी कडक नियमावली
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला आहे. परराज्यातून येणाऱ्या मूर्तींमध्ये पीओपीचे प्रमाण जास्त असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आता कडक तपासणी केली जाणार आहे. चित्रशाळा आणि विक्रेत्यांना केवळ चिकणमाती किंवा शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची विक्री करता येईल. मूर्तीमध्ये पीओपीचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सीमेवर पोलीस, वाहतूक आणि अबकारी खाते केवळ नोंदणीकृत विक्रेत्यांच्याच गाड्यांना गोव्यात प्रवेश देतील.
प्रदूषण नियंत्रण मंडळ, हस्तकला महामंडळ आणि उपजिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या एक महिना आधी चित्रशाळांना भेटी देऊन मूर्तींचे नमुने घेतील. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. यामध्ये पीओपीचे प्रमाण जास्त आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड होईल. अशा मूर्तींची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी विक्रेत्याची असेल. विल्हेवाट न लावल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. तसेच वारंवार नियम मोडणाऱ्या विक्रेत्याची नोंदणी कायमची रद्द केली जाईल.
३० मे पर्यंत नोंदणी अनिवार्य
सर्व विक्रेते आणि चित्रशाळा मालकांना ३० मे २०२६ पर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पोर्टलवर आपली माहिती, पत्ता आणि मूर्ती कोठून आणणार याची माहिती नोंदवावी लागेल. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, अशा आस्थापनांना सील ठोकून ३ हजार रुपये शुल्कासह नोंदणी करून घेण्याची कारवाई केली जाईल. संबंधित पंचायत आणि नगरपालिकांना त्यांच्या क्षेत्रातील नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी ३० एप्रिलपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.