मध्यप्रदेशच्या युवकाचा मृत्यू ड्रग्जच्या कोकटेलमुळेच!

गोमेकॉतील बेडसाइड चाचणीतून निष्पन्न : सहा सायकोअॅक्टिव्ह पदार्थ आढळले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th April, 11:50 pm
मध्यप्रदेशच्या युवकाचा मृत्यू ड्रग्जच्या कोकटेलमुळेच!

म्हापसा : वागातोर येथे मध्यप्रदेशातील ईशान सिंग बडगुजर (२१) या एमबीए विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू हा ड्रग्जच्या प्राणघातक मिश्रणाच्या सेवनामुळे झाल्याचे बेडसाइड चाचणीतून निष्पन्न झाले आहे. पूर्वी हे मृत्यू प्रकरण ड्रग्ज ओव्हरडोस किंवा हृदय विकाराचा प्रकार असल्याचा संशय होता.
गोवा वैद्यकिय इस्पितळात मृतदेहावर रॅपिड बेडसाइड टॉक्सिकोलॉजी स्क्रिनिंग चाचणी करण्यात आली. यात वेगवेगळ्या सहा सायकोअॅक्टिव्ह पदार्थ आढळून आले. ज्याचे अंश हे परवानगी मर्यादीपलिकडे होते. यामध्ये अॅम्फेटामाइन, मेथॅम्फेटामाइन, एमडीए-ए्नस्टसी, कॅनाबिस, बेंझोडायझेपाइन्स आणि दारू यांचा समावेश आहे. हे सर्व नशेली पदार्थ एकत्र सेवन केल्यास एक शक्तिशाली आणि अनेकदा प्राणघातक ठरते.
चाचणीत ओळखल्या गेलेल्या सर्व सहा पदार्थांचे निष्कर्ष हे सकारात्मक आले असून ते निर्धारित पातळीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहेत. यावरून असे स्पष्टपणे दिसून येते की, अनेक औषधे एकत्र घेतल्यामुळे ओव्हरडोस झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
डॉक्टरांच्या मते, अशा मिश्रणांमुळे केंद्रीय मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो किंवा ती अतिउत्तेजित होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, श्वसनक्रिया बंद पडणे किंवा अनेक अवयव निकामी होणे, यांसारखे परिणाम होऊ शकतात. यापैकी कोणताही परिणाम काही मिनिटांतच जीवघेणा ठरू शकतो.
अंतिम अहवालाची प्रतिक्षा न करता, प्राथमिक निष्कर्षांसाठी त्वरीत निदानासाठी अनेकदा वापरल्या जाणाऱ्या बेडसाइड स्क्रिनिंगमुळे या प्रकरणात सुरुवातीचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत. परंतु अंतर्गत अवयवांचे नमुने हे वेर्णा येथील न्यायवैधक प्रयोगशाळेत पूर्वीच पाठवण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण निश्चितपणे समजण्यासाठी तपशीलवार रासायनिक विश्लेषण अहवालाची प्रतिक्षा आहे. या मृत्यू प्रकरणामागे हा एक प्राथमिक ठोस संकेत असून पुष्टीकाकरक न्यायवैधक अहवालातून अधिक स्पष्ट विज्ञान विषयक माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
घटनेच्या दिवशी दि. १ एप्रिल रोजी वागातोर येथे घटनास्थळी मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या संगीत रजनी पार्टीस्थळी मयत तरूण हा कोसळला होता. सुरुवातीला पार्टीस्थळी गोंधळ होता. ज्यामुळे त्याच्या प्रकृतीचे गांभीर्य ओळखण्यात आणि वेळेवर वैद्यकिय मदत मिळवून देण्यास विलंब झाला.
मयत ईशान सिंग बडगुजर (२१, इंदूर, मध्यप्रदेश) याचा मृत्यू हा २ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वा. च्या सुमारास झाला होता. प्रथम त्याला वागातोर व म्हापशातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ त्याच्या मित्रांनी नेले होते. तिथे त्याला दाखल करून घेण्यात न आल्याने म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले होते. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंदवले होते.
प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा
पोलिसांच्या माहितीनुसार या घटनाक्रमाची जुळवाजुळव करण्यासाठी पार्टीचे आयोजक, उपस्थित आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. शिवाय ड्रग्जचा स्रोत आणि पुरवठा साखळी तसेच पार्टीशी संबंधित निष्काळजीपण किंवा बेकायदेशीर कृत्य होते का, याचीही चौकशी सुरू आहे. पुढील तपास रितसर प्रयोगशाळेच्या अहवालानुसार केला जाणार आहे.