आकय-म्हापसा येथील सिमेश्वर मंदिरातील देवपूजेची जबाबदारी पुजाऱ्यावर

मंदिर कारभारात हस्तक्षेप न करण्याचा दोन्ही गटांना उपजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th April, 11:59 pm
आकय-म्हापसा येथील सिमेश्वर मंदिरातील देवपूजेची जबाबदारी पुजाऱ्यावर

म्हापसा : आकय-म्हापसा येथील श्री सिमेश्वर ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थान परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हस्तक्षेप करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी मंदिराचा तात्पुरता कारभार पुजाऱ्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.प्रशासनाच्या आदेशानुसार, मंदिरातील नित्य पूजा तसेच वर्धापन दिनाचे सर्व धार्मिक विधी पुजारीच पार पाडतील. पूजा पूर्ण झाल्यानंतर मंदिर बंद करून कुलूपाची चावी पुजाऱ्यांकडेच राहील. पुढील आदेश येईपर्यंत मंदिराच्या कारभारात कोणत्याही गटाने हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मंदिराच्या आवारात चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ नयेत, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थितीवर बार्देश मामलेदार आणि पोलीस निरीक्षक लक्ष ठेवणार आहेत.
या बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक नवीन देसाई उपस्थित होते. दोन्ही गटांनी आपल्या वकिलांमार्फत भूमिका मांडली; मात्र सामंजस्याचा तोडगा निघू शकला नाही.देवस्थानाच्या ट्रस्ट समितीवरून गेल्या काही काळापासून दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. देवस्थानचे अध्यक्ष साईराज तोरसकर यांच्या नेतृत्वाखालील समिती आणि जयेश कळंगुटकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या दुसऱ्या समितीमध्ये मतभेद वाढले आहेत.
दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल
गेल्या १ एप्रिल रोजी रात्री मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे व वीज दिवे बसवण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचे रूपांतर धक्काबुक्की व मारहाणीमध्ये झाले. या घटनेत सातजण किरकोळ जखमी झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोट
कायदा आणि सुव्यवस्था तसेच परिसरात शांतता राहावी, यासाठी मंदिरात पूजा करण्याची जबाबदारी पुजाऱ्यावर दिली आहे. ते पूजा उरकून मंदिर कुलूप बंद करतील.
-वर्षा परब - उपजिल्हाधिकारी, बार्देश.