ठेकेदाराच्या मनमानी, बेजबाबदार कामामुळे आरोग्य केंद्राचे काम रखडले

कुळे येथील अपूर्ण स्थितीतील ग्रामीण आरोग्य केंद्राचा विषय ऐरणीवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th April, 11:48 pm
ठेकेदाराच्या मनमानी, बेजबाबदार कामामुळे आरोग्य केंद्राचे काम रखडले

धारबांदोडा : कुळे- शिगांव पंचायत मंडळ व धारबांदोडा जिल्हा सदस्य रुपेश देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्य केंद्र सुरू होण्यास विलंब का होत असल्याचे सांगत ठेकेदारावर ठपका ठेवला आहे. ठेकेदाराच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळेच आरोग्य केंद्राचे काम रखडले असल्याचे सांगितले.

कुळे येथील अपूर्ण स्थितीत असलेल्या ग्रामीण आरोग्य केंद्राचा विषय पुन्हा समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी येथील एका युवकाचे निधन झाल्यानंतर नागरिकांकडून सामाजिक माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्य केंद्र सुरू असते तर या युवकाला वाचवणे शक्य झाले असते, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

सरपंच गोविंद शिगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य केंद्राचे काम २०१८ साली सुरू झाले होते. करोना महामारीच्या काळात बांधकाम बंद राहिले. २०२१ साली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कुळे येथे कार्यक्रमाला आले असता केंद्राची पाहणी करून ठेकेदाराला पहिला मजला डिसेंबर २०२१ पूर्वी पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. मात्र, तसे झाले नाही. २०२२ साली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर गणेश गावकर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर पंचायत मंडळाने पुढाकार घेऊन आमदारासोबत ठेकेदाराची बैठक घेऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले परंतु ठेकेदाराने दाद दिली नाही. गोवा साधन सुविधा महामंडळाने सन २०१९ ते २०२५ पर्यंतच्या कालावधीत ४८ वेळा ठेकेदाराला कारणे दाखवा नोटी​स बजावली तरीही ठेकेदारावर परिणाम झाला नाही. या कारणाने सध्या नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आमदार गणेश गावकर यांनी वेळोवेळी आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा पाठपुरावा केला असून विधानसभेतही दोन वेळा प्रश्न उपस्थित केले आहेत. पंचायत मंडळांनी अनेक वेळा ठेकेदाराला बांधकामाची सविस्तर माहिती घेण्याची मागणी केली होती पण त्याकडे त्याने लक्ष दिले नाही.

नवीन ठेकेदाराची नियुक्ती केल्याने ग्रामीण आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याबद्दल लोकांनी खात्री बाळगावी असे आवाहन केले.

यावेळी उपसरपंच नेहा मडकईकर, पंच सदस्य साईश नाईक, प्रसाद गावकर, अजय बांदेकर, सोनम डोईफोडे उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी

कुळे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्रित आल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा पंचायत सदस्य रुपेश देसाई, सरपंच गोविंद शिगावकर, माजी सरपंच मनीष लांबोर व अन्य लोकांनी चर्चा केली. अंदाजे ३०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी एकत्रित येऊन प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा