हणजूण येथील म्युझिक इव्हेंटविरोधात ईडीकडे तक्रार करणार : काँग्रेस

तिकीट विक्रीत आर्थिक घोटाळ्याचा संशय; पाटकर आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th April, 11:34 pm
हणजूण येथील म्युझिक इव्हेंटविरोधात ईडीकडे तक्रार करणार : काँग्रेस

पणजी : हणजूण येथे शुक्रवारी ब्लॅक कॉफी नामक म्युझिक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. इव्हेंटसाठी अग्निशामक दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोमुनिदादने परवानगी दिली नव्हती. तरीही त्याचे आयोजन करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही वेळीच हस्तक्षेप केल्याने इव्हेंट झाला नाही. या इव्हेंटमध्ये तिकीट विक्रीतून आर्थिक घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. यामुळे आम्ही इव्हेंट विरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
पणजीत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी सांगितले की, इव्हेंटसाठी २० हजार रुपये तिकीट होते. सुमारे ३ हजार तिकिटे विकली गेली होती. परवाना नसताना तिकीट विक्री करणे हा आर्थिक गुन्हा आहे. याशिवाय गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती समाजात दुखवटा असतो. हे माहीत असून देखील असले इव्हेंट आयोजित करणे अयोग्य होते. यामुळे समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला. याची माहिती मिळाल्यावर आम्ही अग्निशामक दल, प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क केला. दोन्ही खात्याने आपण कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‍‍गुड फ्रायडे हा ख्रिस्ती समाजासाठी दुखवटा पाळण्याचा पवित्र दिवस आहे. हे माहीत असूनही अशा इव्हेंटचे आयोजन करणे म्हणजे समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होता. तसेच, अशा महत्त्वाच्या दिवशी उपजिल्हाधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांचे फोन बंद असणे ही गंभीर बाब असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. हणजूण कोमुनिदादने ऐनवेळी आपली परवानगी मागे घेतली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘त्या’ मृत्यूची चौकशी व्हावी
यावेळी पाटकर यांनी सांगितले की, हणजूण येथेच मूळच्या इंदूर येथील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ब्लॅक कॉफी इव्हेंटच्या अगदी जवळच असणाऱ्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. हा मृत्यू ड्रग्जमुळे झाला का याची चौकशी झाली पाहिजे. याबाबत डॉक्टरांचे पॅनल करून मृतदेहाची तपासणी करावी.

हेही वाचा