घातक विषारी रसायनांचा शोध घेणारी ‘नॅनोझाइम पेपर-स्ट्रीप’ विकसित

संशोधनात गोव्यातील शास्त्रज्ञ डॉ. अमित वेर्णेकर यांचा सहभाग

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th April, 01:08 pm
घातक विषारी रसायनांचा शोध घेणारी ‘नॅनोझाइम पेपर-स्ट्रीप’ विकसित

पणजी : देशातील अग्रगण्य संशोधन (Research) संस्था ‘सीएसआयआर-सीएलआरआय’च्या' (CSIR-CLRI), चेन्नई (Chennai) येथील शास्त्रज्ञांनी (Scientist)  मानवी मज्जासंस्थेला घातक ठरणारी रसायने शोधण्यासाठी एका विशेष 'नॅनोझाइम' पेपर-स्ट्रिप’ विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे युद्धातील रासायनिक हल्ल्यांमध्ये वापरले जाणारे 'नर्व्ह एजंट' किंवा विषारी कीटकनाशकांचे अस्तित्व अवघ्या काही सेकंदात ओळखणे शक्य होणार आहे. या संशोधनात गोव्यातील शास्त्रज्ञ डॉ. अमित ए. वेर्णेकर यांचा मोठा वाटा आहे. 

संशोधनात शास्त्रज्ञ डॉ. अमित ए. वेर्णेकर आणि त्यांचे पीएचडी विद्यार्थी हुईड्रोम मंगलसना यांच्या नेतृत्वाखालील टीमने सीई-बीटीबी-एमओएल (Ce-BTB-MOL)  नावाच्या सीरियम-आधारित पदार्थाचा वापर केला आहे. हा पदार्थ एखाद्या कृत्रिम एन्झाइमसारखा (नॅनोझाइम) काम करतो. जेव्हा हे नॅनोझाइम विषारी 'ऑर्गनोफॉस्फेट' रसायनांच्या संपर्कात येते, तेव्हा ते या रसायनांचे वेगाने विघटन करते आणि स्वतःचा रंग बदलते. हे संशोधन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल 'केमिस्ट्री - अ युरोपियन जर्नल' मध्ये प्रकाशित झाल्याची माहिती डॉ. अमित वेर्णेकर यांनी दिली. 

शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने 'पॅराथियान' आणि 'पॅराऑक्सॉन' यांसारख्या रसायनांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पूर्वी ही रसायने कीटकनाशक म्हणून वापरली जात होती.  परंतु त्यांच्या घातक परिणामकारकतेमुळे (कर्करोग आणि जन्मदोष) अनेक देशांत त्यांच्यावर बंदी आहे. 'पॅराऑक्सॉन' हे पॅराथियानपेक्षा ५० पटीने अधिक विषारी असून, भूतकाळात रासायनिक युद्धांमध्येही त्याचा वापर झाल्याची चर्चा आहे.

पूर्वीच्या चाचणी पद्धतींमध्ये एक मोठी समस्या होती. विषारी रसायनांचे विघटन झाल्यावर पिवळा रंग तयार व्हायचा, परंतु चाचणीसाठी वापरली जाणारी साधनेही पिवळसर रंगाचीच असल्याने अचूक निष्कर्ष काढणे कठीण व्हायचे. ‘सीएसआयआर-सीएलआरआय’च्या या नवीन तंत्रज्ञानाने ही अडचण दूर केली आहे.

 * नॅनोझाइम पेपर-स्ट्रिप रसायनाच्या संपर्कात येताच अवघ्या १३ सेकंदात त्याचा रंग बदलू लागतो.

 * पुढील ३५ सेकंदात हा रंग गडद नारंगी-तपकिरी होतो.

 * हा बदल इतका स्पष्ट असतो की, डोळ्यांनीही सहज ओळखता येतो.

हे तंत्रज्ञान केवळ स्वस्तच नाही तर वापरण्यास अत्यंत सोपे आहे. या पेपर-स्ट्रिपवरील रंगाची तीव्रता स्मार्टफोनद्वारे मोजली जाऊ शकते. यामुळे हे उपकरण पोर्टेबल असून; लष्करी जवान, आपत्ती व्यवस्थापन टीम किंवा औद्योगिक सुरक्षा रक्षक याचा वापर प्रत्यक्ष घटनास्थळी करू शकतात असे डॉ. वेर्णेकर यांचे म्हणणे आहे. 

प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याचे ध्येय : डॉ. वेर्णेकर 

डॉ. अमित वेर्णेकर यांच्या मते, हे तंत्रज्ञान सध्याच्या पद्धतींपेक्षा अधिक अचूक आहे. हे नॅनोझाइम इतर सामान्य रसायनांपासून विषारी नर्व्ह एजंट्सना अचूकपणे वेगळे ओळखू शकते. भविष्यात केवळ ५ सेकंदात आणि नॅनो-ग्रॅम इतक्या अत्यल्प प्रमाणातील विषारी अंश शोधू शकणारे प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याचे त्यांचे ध्येय आहे. संरक्षण सज्जता, औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने भारताचे हे यश मैलाचा दगड मानले जात आहे.

हेही वाचा