
पणजी : कुडचडे (Curchorem) येथील लैंगिक अत्याचार (Sexual assault) प्रकरणातील संशयित सोहम नाईक याला बाल न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत आहे. संशयित सोहम नाईकला मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
लैंगिक अत्याचारप्रकरणी कुडचडे पोलिसांनी (Curchorem Police) सोहम नाईक (Soham Naik) याला अटक केली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत सोहम नाईक याच्याविरुद्ध पाच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
त्यातील चार गुन्हे पीडितांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले आहेत. दोन गुन्हे कुडचडे पोलिसांनी दाखल करून गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. लैंगिक शोषण झालेल्यात अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. एका पीडितेवर १४ वर्षांची असताना लैंगिक अत्याचार झाला होता. याप्रकरणी सध्या न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जबाब नोंदवणे सुरू आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयिताकडून पुढील चौकशी करून घटनेशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.