इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई अजून बेशुद्धावस्थेत

स्थिती‌ चिंताजनक; गुप्तचर अहवालामुळे वाढली चिंता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
59 mins ago
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई अजून बेशुद्धावस्थेत

तेहरान : युद्धात जखमी झालेले इराणचे (Iran) सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) अजून बेशुद्धावस्थेत  असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे.  गुप्तचर अहवालानुसार, ते कूम (Qom) येथे उपचार घेत असून; त्यांच्या प्रकृतीची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, अमेरिकन (United States) आणि इस्रायली (Israel)  गुप्तचर (intelligence) यंत्रणांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेल्या एका राजनैतिक मेमोमध्ये खामेनेई निर्णय घेण्याच्या स्थितीत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इराणच्या सत्ताकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुप्तचर अहवालामुळे वाढली चिंता

या मेमोमध्ये प्रथमच खामेनेई यांच्या गंभीर प्रकृतीबाबत माहिती उघड झाल्याचे सांगितले जाते. हा अहवाल पाश्चात्य आणि प्रादेशिक गुप्तचर नेटवर्कमध्ये फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. वॉशिंग्टनमधील संबंधित यंत्रणांशीही या संदर्भात संपर्क साधण्यात आला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर

पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून मोजतबा खामेनेई सार्वजनिकरित्या कुठेही दिसलेले नाहीत. त्यांच्या नावाने प्रसिद्ध होणारी विधाने केवळ इराणी सरकारी माध्यमांतूनच प्रसारित होत असल्याचेही अहवालात नमूद आहे. दरम्यान, अप्रमाणित माहितीनुसार, माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीलाही कूममध्ये सुरूवात झाल्याची चर्चा आहे.

अमेरिकेचा इराणला अल्टिमेटम

या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण तणाव अधिकच तीव्र झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत ठराविक मुदतीत करार करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी ही वेळ “अत्यंत निर्णायक” असल्याचे सांगितले. “इराणने मुदतीत निर्णय घेतला नाही, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

मध्यपूर्वेत तणाव शिगेला

फेब्रुवारी २८ पासून सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या नेतृत्वाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा