काजू हंगाम ऐन भरात असताना शेतकरी धास्तावले; सावधगिरी बाळगा-मोपाच्या सरपंचांनी जारी केली सूचना

दोडामार्ग/ पेडणे : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या निसर्गरम्य सीमावर्ती भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दहशत निर्माण करणारा 'ओंकार' हत्ती पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सुमारे साडेतीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर ओंकारने सावंतवाडी-दोडामार्ग परिसरातून पायपीट करत आज गोव्यातील पेडणे तालुक्यातील मोपा परिसरात एन्ट्री मारली आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या काजू आणि आंब्याचा हंगाम सध्या ऐन भरात असतानाच हत्तीचे दर्शन झाल्याने बागायतदार आणि सामान्य शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत. त्यांच्यासमोर आता आर्थिक संकटासोबतच जिवाचा धोकाही निर्माण झाला असून, दोन्ही राज्यांचे वन विभाग हायअलर्टवर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोपा हे गाव महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले असल्याने हत्तीला या दोन्ही राज्यांमध्ये ये-जा करणे सोपे झाले आहे. सध्या सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरात एकूण सहा हत्तींचा वावर असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. यातील पाच हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सक्रिय आहे, तर 'ओंकार' मात्र एकटाच सीमाभागात फिरत असून त्याने मोपा विमानतळ परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे. रात्रीच्या वेळी बागायतींमध्ये शिरून काजूची झाडे उपटून टाकणे आणि उभ्या पिकांची नासाडी करणे यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल होत आहेत. वन कर्मचारी हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असले, तरी दाट झाडी आणि डोंगराळ भागामुळे त्याला रोखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत तांबोसे–मोपा–उगवे ग्रामपंचायतीचे सरपंच सुबोध महाले यांनी रविवारी ग्रामस्थांसाठी तातडीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी रात्रीचा प्रवास टाळावा, घराबाहेर पडताना समूहाने राहावे आणि हत्ती दिसल्यास त्याला कोणत्याही प्रकारे चिथावणी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हत्तीचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले असून, गावपातळीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या हत्तीच्या त्रासातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याला जेरबंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया सध्या न्यायालयीन पेचात अडकली आहे. एका सामाजिक संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हत्तीला पकडण्याची मोहीम लांबणीवर पडली आहे. या तांत्रिक आणि कायदेशीर गुंतागुंतीमुळे वन विभागाचे हात बांधले गेले आहेत. जोपर्यंत न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत हत्तीचा हा उपद्रव असाच सुरू राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी आर्त हाक सीमाभागातील शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.