निसर्गातील बदल टिपण्याची अद्भूत क्षमता प्राण्यांकडे असते. त्यांच्या तीव्र संवेदनेंद्रियांमुळे नैसर्गिक आपत्तींचे संकेत त्यांना आधीच मिळतात. या लेखात प्राण्यांचे वर्तन आणि आपत्तींचा असलेला हाच रंजक व महत्त्वपूर्ण संबंध

नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, चक्रीवादळ, वादळ, ज्वालामुखी उद्रेक, वन्यप्राण्यांच्या जीवनावर थेट परिणाम करतात. शास्त्रज्ञांच्या मते, प्राण्यांकडे अत्यंत संवेदनशील इंद्रिये असतात, ज्यामुळे ते नैसर्गिक आपत्तींचे संकेत आधीच ओळखू शकतात जे मानवांना लगेच जाणवत नाहीत. हत्ती भूकंपापूर्वी अस्वस्थ होऊन सुरक्षित ठिकाणी जातात, पक्षी चक्रीवादळापूर्वी दूर उडून जातात, मासे भूकंपापूर्वी पाण्याच्या वर येतात; अशा प्रकारे प्राणी नैसर्गिक आपत्तींशी निगडित बदल आधीच ओळखू शकतात. यामुळे त्यांचे वर्तन बदलते आणि ते सुरक्षिततेकडे वळतात. प्राणी आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यात एक अप्रत्यक्ष पण महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे यावरून स्पष्ट होते.
वर्ष २०२५ मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्याच्या सियाथी गावात श्वानाच्या एका छोट्याशा पिल्लाने गावकऱ्यांना भूस्खलनापासून वाचवल्याची बातमी बरीच चर्चेत आली. निसर्गात असे कित्येक प्राणी आहेत जे नैसर्गिक आपत्ती आधीच ओळखू शकतात. हिमाचलमधील घटनेतील श्वानाच्या सतर्कतेमुळे ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली.
२००४ साली हिंद महासागरात उसळलेल्या भयंकर त्सुनामीच्या काळादरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आली होती, ती म्हणजे गजराजांचे स्थलांतर. त्सुनामी येण्यापूर्वी हत्तींच्या वागणुकीत काही विशेष बदल दिसून आले होते. त्सुनामीच्या काही तासांपूर्वी हत्ती अचानक समुद्रकिनाऱ्यापासून दूर उंच जागेच्या दिशेने धावू लागल्याचे लोकांनी पाहिले. ते अस्वस्थ आणि घाबरलेले दिसत असल्याची नोंद आहे. हत्ती जमिनीतील सूक्ष्म कंपने ओळखू शकतात. 'लो-फ्रिक्वेन्सी' (कमी वारंवारतेचे) आवाज ऐकण्याची क्षमता असल्याने ते आधीच समुद्रातील हालचालींचा अंदाज घेऊ शकतात.
प्राण्यांमध्ये कंपन, विद्युत आणि चुंबकीय बदल, आवाज, वातावरणातील दाबातील बदल, वास आणि रासायनिक बदल ओळखण्याची क्षमता असते. हे प्राणी आपत्ती येण्यापूर्वी असामान्य वर्तन दर्शवतात. तीव्र संवेदनक्षमतेमुळे प्राणी जमिनीतील सूक्ष्म कंपने, हवेच्या दाबातील बदल आणि इतर नैसर्गिक संकेत आधीच ओळखतात. कुत्रे, हत्ती, साप यांसारखे प्राणी भूकंप येण्यापूर्वी पृथ्वीमध्ये निर्माण होणारी सूक्ष्म कंपने आधीच ओळखतात. त्यामुळे ते अस्वस्थ होतात किंवा सुरक्षित ठिकाणी पळतात.
काही प्राणी जसे हत्ती आणि पक्षी, वादळ किंवा त्सुनामी येण्यापूर्वी निर्माण होणारे अतिशय कमी वारंवारतेचे आवाज ऐकू शकतात. ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधी किंवा भूकंपापूर्वी हवेमध्ये काही रासायनिक बदल होत असतात. प्राण्यांची वास घेण्याची क्षमता तीव्र असल्यामुळे ते हे बदल ओळखू शकतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल झाल्यास पक्षी आपली दिशा बदलतात व सुरक्षित ठिकाणी वळतात. वादळ किंवा चक्रीवादळ येण्यापूर्वी बदलणारा हवेचा दाब पक्षी आणि मासे पटकन ओळखू शकतात.
ओडिशाच्या किनारपट्टीवर 'फायलिन' चक्रीवादळ धडकण्यापूर्वी तेथील अनेक पक्षी अचानक किनारपट्टी सोडून गेल्याचे निदर्शनास आले होते. हवेतील दाबातील बदल ओळखल्यामुळे ते उडून गेले होते. वादळ किंवा भूकंपापूर्वी अस्वस्थ झालेली गुरे व इतर जनावरे पाहिल्याचे त्यांचे मालकही सांगतात. काही जनावरे आपत्तीपूर्वी अन्न खाणे थांबवतात, तर काही घाबरून इकडे-तिकडे पळू लागतात.
संपूर्ण आयुष्य डबक्यात व्यतीत करणारा बेडूकदेखील अत्यंत संवेदनक्षम असतो. तो हवामानातील आर्द्रतेतील बदल लगेच ओळखतो. मोठा पाऊस कोसळण्याआधी बेडूक आपली जागा बदलतात व सुरक्षित ठिकाणी जातात. भूकंप होणार असल्याचे सापांना आधीच जाणवते. ते ओळखून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी साप आपल्या बिळातून बाहेर येतो. पक्षी वातावरणातील हवेचा दाब आणि बदल पटकन ओळखतात; वादळ किंवा चक्रीवादळ येण्यापूर्वी ते स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे जलाशयातील प्राणी जसे की मासे, पाण्यातील रासायनिक बदल किंवा कंपने पटकन ओळखतात व पाण्याच्या वर येतात.
थोडक्यात सांगायचे तर, निसर्गातील प्रत्येक हालचाल आणि बदल ओळखण्याची एक अद्भूत नैसर्गिक प्रणाली प्राण्यांकडे असते. मानवी तंत्रज्ञान जिथे अपुरे पडते, तिथे प्राण्यांची ही तीव्र संवेदनक्षमता एक 'नैसर्गिक इशारा प्रणाली' (Early Warning System) म्हणून काम करते. प्राण्यांच्या वर्तनातील या बदलांकडे केवळ योगायोग म्हणून न पाहता, जर आपण त्यांच्या संकेतांचे योग्य आकलन केले आणि निसर्गाशी नाते जपले, तर भविष्यातील अनेक मोठ्या नैसर्गिक संकटांची तीव्रता कमी करून मनुष्यहानी टाळणे शक्य होईल. प्राण्यांचे हे असामान्य कौशल्य आजही विज्ञानासाठी एक मोठे कुतूहल आणि अभ्यासाचा विषय आहे.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)