लोकवाद्यांचा निनाद, वीरभद्राला प्रेरणा देण्यासाठी सभोवताली लोकांचा पडलेला गराडा, उत्स्फूर्त उत्साहात सादर होणारे नृत्य आणि सभोवताली पसरलेल्या अग्निज्वाळा... हे वातावरण भारावून टाकणारे असते.

वीरभद्र म्हटले की आठवतो तो साखळीच्या विठ्ठलापूरचा चैत्र उत्सव. या उत्सवात शेवटच्या रात्री, म्हणजेच चैत्र पौर्णिमेला वीरभद्राची शेकडो वर्षांपासूनची परंपरा पाहायला मिळते. वीरभद्र हा शिवगणातील एक आहे. भगवान शंकराच्या जटेतून त्याची निर्मिती झाली असून, देवी पार्वतीचा तिच्याच माहेरी झालेला अपमान आणि अवहेलना सहन न झाल्याने शंकराने आपल्या जटेतून वीरभद्राला जन्म दिला, अशी कथा सर्वतोमुखी आहे.
त्याचे असे झाले की, एकदा राजा दक्षाने आपल्या नगरीत महायज्ञाची तयारी सुरू केली. देशोदेशीच्या राजांना त्यांनी निमंत्रणे पाठवली; मात्र जावई भगवान शंकर आणि मुलगी पार्वतीला त्यांनी यज्ञात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले नाही. कितीही झाले तरी आपल्या माहेरीच हा यज्ञ होत आहे आणि यज्ञाच्या गडबडीत वडील निमंत्रण द्यायला विसरले असावेत, असा समज पार्वतीने करून घेतला आणि ती यज्ञाचे रीतसर निमंत्रण नसतानाही त्यात सहभागी होण्यासाठी माहेरी रवाना झाली.
सर्वत्र गुढ्या-तोरणे उभारली होती. उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात सर्वांचीच लगबग सुरू होती. मंत्रोच्चारामुळे सर्वत्र धीरगंभीरता पसरली होती. पार्वती तिथे पोहोचली, पण याची कोणी साधी दखलही घेतली नाही. पार्वती किंचित दुखावली खरी; परंतु यज्ञघर असल्याने सगळेच घाईत असतील आणि आपण आल्याचे कोणाच्याही लक्षात आले नसेल, असा समंजस विचार तिने केला. जिथे यज्ञ सुरू होता, त्या जागी ती पोहोचली. तिथला झगझगाट आणि चकाकी पाहून तिचे डोळे दिपले. भरजरी पोशाखातील राजे-महाराजे आणि त्यांचे कुटुंबीय... सर्वत्र वैभवाच्या खुणा तिला दिसत होत्या. ती मात्र अगदीच साध्यासुध्या वेशभूषेत होती. तिथे जमलेले लोक तिच्याकडे तुच्छतेने पाहत असल्याचे तिला जाणवले. खुद्द तिचे वडीलच तिला पाहून न पाहिल्यासारखे करत होते, याचेच तिला वाईट वाटले. मुळात पार्वती तिथे न बोलावता आली, याचा प्रचंड राग राजा दक्षाला आला होता. त्याने सर्वांसमक्ष तिचा अपमान केला.
पित्याने दिलेली ही अपमानास्पद वागणूक पार्वतीला सहन झाली नाही. सर्वांसमक्ष तिने धगधगत्या यज्ञकुंडात स्वतःला झोकून दिले. या अनपेक्षित घटनेने सगळे हबकून गेले. भगवान शंकरांना जेव्हा पार्वतीविषयी कळले, तेव्हा ते क्रोधायमान झाले. ते वायुगतीने यज्ञमंडपात पोहोचले आणि त्यांनी डोक्यावरील जटा काढून जमिनीवर आपटली. त्यासरशी जटेतून भव्यदिव्य, महाशक्तिशाली आणि अक्राळविक्राळ अशा व्यक्तिमत्वाची निर्मिती झाली. त्याने यज्ञमंडपात हाहाकार माजवला; सर्वांना पळता भुई थोडी झाली. पार्वतीच्या अपमानाचा बदला घेऊनच तो शांत झाला. शंकराच्या जटेतून ज्याचा जन्म झाला, तोच म्हणजे वीरभद्र!
गोव्यात ठिकठिकाणी वीरभद्राच्या नृत्याची परंपरा पाहायला मिळते. विठ्ठलापूर-साखळी येथे चैत्र पौर्णिमेला हा उत्सव होतो, तर सांगे येथे गुढीपाडव्याला आणि फोंडा-शिरोडा येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी वीरभद्राचे नृत्य वीरश्रीत सुरू होते. ते दृश्य खरोखरच बघण्यासारखे असते. शिरोडा येथील महामाया मंदिराच्या आवारातून वीरभद्राच्या जोशपूर्ण नृत्याची सुरुवात होते. त्यासाठी हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका घरात त्याची वेशभूषा केली जाते. महामाया मंदिर परिसर ते हनुमान मंदिर आणि थोडे पुढे कामाक्षी मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यात ठिकठिकाणी गवताच्या छोट्या-मोठ्या मोळ्या ठेवल्या जातात.
महामायेच्या प्रवेशद्वाराशी असणाऱ्या मंडपासमोर शंखध्वनी आणि ढोल-ताशांच्या निनादात वीरभद्राची मिरवणूक सुरू होते आणि मारुती मंदिरासमोर ती विसर्जित होते. तत्पूर्वी हनुमान मंदिरात गाऱ्हाणे घालून वीरभद्र साकारणाऱ्या व्यक्तिमत्वाला महामायेच्या प्रवेशद्वारावरील मंडपात आणले जाते आणि तिथे प्रभावळ बांधली जाते. त्यानंतर ढोल, ताशे आणि कासाळ्यांच्या निनादात नृत्य आणि अग्निदिव्याचा थरार सुरू होतो. गवताच्या एकेका मोळीला आग लावली जाते आणि त्याचा भडका उडतो. पेटवलेली प्रत्येक मोळी धगधगत असताना नृत्य करत ओलांडली जाते. अशा शेकडो मोळ्या पेटवल्या जातात. लोकवाद्यांचा निनाद, वीरभद्राला प्रेरणा देण्यासाठी सभोवताली लोकांचा पडलेला गराडा, उत्स्फूर्त उत्साहात सादर होणारे नृत्य आणि सभोवताली पसरलेल्या अग्निज्वाळा... हे वातावरण भारावून टाकणारे असते. पिंपळपाराला प्रदक्षिणा घालून नृत्य पुढे सरकते आणि शेवटी हनुमान मंदिरात विसर्जन होते.
वीरभद्राची ही परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आज ती टिकवून ठेवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोककलाकार शिवलिंग रमेश नाईक यांनी वीरभद्राची भूमिका साकारत ही परंपरा प्रवाहित ठेवली आहे. महामाया मंडपाचे प्रवेशद्वार ते हनुमान मंदिर इथपर्यंत पेटवलेल्या गवताच्या मोळ्या नृत्याच्या जोडीने ओलांडणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी सकारात्मक मनोवृत्ती, चिरंतन तत्त्वावर मनःपूर्वक श्रद्धा, समर्पित भाव आणि सेवाभावी वृत्ती असणे गरजेचे आहे. शिवलिंग नाईक यांच्याकडे हे वेगळेपण आहे, जे त्यांच्या एकाग्र नृत्यकौशल्यातून जाणवते. डिचोलीतील फोगेरीमध्ये साकारली जाणारी वीरभद्र नृत्याची परंपरा आणि शिरोडा येथील परंपरा यांच्या सादरीकरणात बरेच साम्य दिसून येते. वीरभद्राच्या या भूमिकेचे लोकमानसाला मोठे आकर्षण आहे.
वारखंडे-फोंडा येथील धालोच्या मांडावरही या नृत्याची प्रचिती येते. संहारक व सर्जक, उग्र व कलात्मक आविष्काराची उत्स्फूर्तता देणारे हे नृत्य गोव्याच्या मंदिर परंपरेतील सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक प्रवाहांचे वैभव अधोरेखित करते.

- पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)