भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क असून तिथे करिअरच्या अफाट संधी आहेत. तांत्रिक आणि अतांत्रिक अशा विविध क्षेत्रांत तरुण आपले भविष्य घडवू शकतात. रेल्वेतील नोकरीच्या संधींविषयीची ही सविस्तर माहिती.

भारतीय रेल्वेतील करिअरच्या संधी
आपल्या देशातील भारतीय रेल्वेचा वार्षिक कारभार साधारण ५०,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. यावरून रेल्वे हे रोजगाराचे किती मोठे क्षेत्र आहे, हे आपल्या लक्षात येईल. सध्या रेल्वेमध्ये अंदाजे १५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत; ही संख्या जणू संपूर्ण गोव्याच्या लोकसंख्येइतकी आहे. दरवर्षी हजारो कर्मचारी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन भरती केली जाते. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या या नोकऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधीच आहेत. रेल्वे भरतीची माहिती प्रामुख्याने 'रोजगार समाचार' (Employment News) आणि विविध वृत्तपत्रांमधून 'NTPC' या नावाने प्रसिद्ध होत असते.
NTPC म्हणजे काय?
NTPC म्हणजे 'नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी'. भारतीय रेल्वेमध्ये दररोज सुमारे २२,००० गाड्या धावतात आणि ७ हजार रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांना सेवा दिली जाते. या अवाढव्य व्यवस्थेत 'तांत्रिक' (Technical) आणि 'अतांत्रिक' (Non-Technical) अशा दोन प्रमुख विभागांत कामे चालतात. तांत्रिक विभागात आयआयटी (IIT) पासून डिप्लोमा केलेल्या अभियंत्यांचा समावेश असतो.
अतांत्रिक (Non-Technical) पदे:
ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण केली आहे किंवा जे १२ वी उत्तीर्ण आहेत, त्यांच्यासाठी अतांत्रिक पदे उपलब्ध असतात. यामध्ये प्रामुख्याने खालील पदांचा समावेश होतो:
स्टेशन मास्टर, गार्ड, तिकीट कलेक्टर (TC).
अकाऊंटंट, कॅशिअर, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स (HR).
स्टोअर कीपर, वेअर हाऊस मॅनेजर, परचेस ऑफिसर.
क्लार्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, लाईनमन आणि डिस्पॅच ऑफिसर.
या पदांसाठी कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ अशा विविध श्रेणी असतात. रेल्वे भरती बोर्डातर्फे (RRB) यासाठी सातत्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात.
पात्रता आणि परीक्षा पद्धत:
१८ ते ३३ वयोगटातील कोणतीही स्त्री किंवा पुरुष या परीक्षांसाठी पात्र असतात. ही परीक्षा 'कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट' (CBT) स्वरूपात घेतली जाते. विशेष म्हणजे, ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसोबतच सर्व प्रादेशिक भाषांमध्ये (उदा. मराठी, कोकणी) देता येते.
संधी आणि आव्हाने:
रेल्वेतील नोकरीमध्ये उत्तम पगार आणि केंद्र सरकारच्या शानदार सोयी-सुविधा मिळतात. युपीएससी (UPSC) आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाते. गोव्यातील अनेक पदवीधर तरुण या पदांसाठी पात्र आहेत, परंतु दुर्दैवाने गोमंतकीय तरुणांमध्ये रेल्वेकडे केवळ 'प्रवासी' म्हणून पाहण्याची वृत्ती अधिक आहे. रेल्वेतील करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आता गरज आहे.
गोव्यातील केपे, सांगे, सावर्डे यांसारख्या भागांतील ग्रामीण विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्कीच विचार करावा. कोकण रेल्वे आणि या भागातील इतर रेल्वेची भरती 'आरआरबी (RRB) मुंबई' मार्फत केली जाते.
सध्या भारतात वंदे भारत, मेट्रो आणि बुलेट ट्रेनचे जाळे वेगाने विस्तारत आहे. यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी आणखी वाढणार आहेत. योग्य जिद्द, थोडे प्रशिक्षण आणि मेहनतीची तयारी ठेवल्यास यश नक्कीच मिळेल. गोमंतकीय विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन रेल्वेच्या प्रगतीत आपला वाटा उचलावा.

- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)