मुख्य प्रवाहाच्या प्रतीक्षेत गोव्यातील वानरमारे आदिवासी समाज

गोव्यातील जंगलांमधून रोजंदारीवर आलेल्या वानरमारे समाजाचा संघर्ष, त्यांच्या शैक्षणिक अडचणी आणि प्रशासकीय ओळखीसाठी सुरू असलेली धडपड मांडणारा, प्रा. सागर डवरी यांचा हा डोळे उघडणारा सामाजिक लेखाजोखा.

Story: भवताल |
04th April, 11:13 pm
मुख्य प्रवाहाच्या प्रतीक्षेत गोव्यातील वानरमारे आदिवासी समाज

​​काही वर्षांपूर्वी यावर लिहिलं होतं, पण अजूनही काही लिहायचं बाकी होतं जे पुन्हा सांगावंसं वाटतंय; कारण संवेदना असणाऱ्या मनापर्यंत काही गोष्टी पोहोचायला हव्यात. आज जाणून घेऊया थोडं 'वानरमारे' समाजाबद्दल.

​गोव्यात फारच तोकडा म्हणावा असा मोजक्या स्वरूपाचा 'कातकरी' हा आदिवासी समाज वास्तव्यास आहे. सध्या पेडणे आणि फोंडा अशा दोन तालुक्यांत त्यांचं वास्तव्य आहे. त्यांची पाळेमुळे अगदी परराज्यातही आहेत. 'वानरमारे' म्हणून तो काहीसा आपल्याला परिचित आहे. जंगलातील जीवन आणि त्याआधारित त्यांची दैनंदिन कामे, पण जंगल कायद्याने त्यांची उपजीविका धोक्यात आली. शिकारी बंद झाल्या आणि मग त्यांना जंगलातून बाहेर पडून रोजंदारीची कामे करावी लागली. मुळात जंगलात राहणारा हा समाज इतर तुलनात्मक विकसित समाजापासून तसा दूर-विभक्त राहणारा. यांच्या प्रशासकीय नोंदी सापडत नाहीत, कारण यांच्यामध्ये कुणी फारसे शिकले नाहीत किंवा या नोंदी कराव्यात इतकी समज कुणाला नव्हती. प्रशासनानेही त्या केल्या नाहीत. याचा परिणाम म्हणजे त्यांना त्यांची कागदोपत्री ओळख मिळवायला येणाऱ्या हजारो अडचणी. यांच्या जातींचा उल्लेख ना कुठे सापडतो, ना यांच्या जन्माचे दाखले मिळतात. मग आपोआपच सरकारी सुविधांपासून यांची फारकत होते. 'संवेदन केंद्र' ही संस्थाही त्यांच्यासाठी काम करते, तसेच काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सहाय्य करत असतात.

​गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि जी.एस.आर.एफ. (GSRF) गोवा यांच्या सहयोगातून एक शैक्षणिक प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी संवेदन केंद्र या संस्थेचेही सहाय्य मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा पेडण्यातील या समाजाच्या जवळ जाण्याचा योग आला. असे प्रकल्प प्रशासनाकडून राबवले जातायत याचं खरंतर स्वागत करावं लागेल. याआधी मी 'द प्रेसेन्स फाऊंडेशन' (मैया आश्रम), मोरजी या सेवाभावी संस्थेमार्फत त्यांच्या संपर्कात होतोच. ही संस्था त्यांना सढळ हाताने मदत करत असते. सध्या मला तेथील मुलांना शिक्षणाचे धडे देताना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता येत आहे. त्यांच्याशी संवाद साधता येत आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेता आल्या.

​तात्पुरत्या मिळालेल्या जमिनीवर उभारलेली झोपडीवजा वस्ती खरंतर विकासाच्या चित्रामागचे लपलेले गडद रंग दाखवते. बरं, ही जमीन प्रशासनाची नसून पेडण्यातील संस्थानिकांनी तात्पुरत्या स्वरूपाची दिलेली आहे. त्या बदल्यात ही माणसं त्यांच्याकडे कामाला जातात. पण ही गोष्टही काही कमी नाही. त्यांचे उपकारच मानावे लागतील, नाहीतर त्यांना आजही असेच भटकत - जिथे काम तिथे वस्ती - असे जिणे जगावे लागले असते. मूलभूत सुविधांपासून वंचित ही वस्ती ऊन-वारा-पाऊस झेलत उभी आहे. 'हर घर शौचालय' हा नारा लागत असताना इथे मात्र विरोधाभास दिसतो. जिथं घरंच नाहीत, तिथं शौचालय कुठून आणायचं? गेल्या चार ते पाच पिढ्या गोव्यात घालवलेला हा आदिवासी समाज आजही आपली कागदोपत्री ओळख मिळवण्यासाठी धडपडताना दिसतो. इथल्या झोपडीतही मोठी स्वप्नं आहेत, पण त्याला दारिद्र्याची दुखरी झालर दिसते. पंख आहेत पण त्यांना बळ कमी, हे प्रत्यक्ष तिथं पोहोचल्यावर प्रकर्षाने जाणवते.

​या मुलांना शिकवताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, या समाजात अजूनही शिक्षणाबद्दल म्हणावी तेवढी जाणीव-जागृती नाही. राहण्याच्या समस्या आहेतच, पण बऱ्याच वेळा अंग झाकण्याचे कपडेही व्यवस्थित नसतात. स्वच्छतेबाबतही चांगल्या सवयी रुजण्याची गरज आहे. कुणी ना कुणी या वस्तीवर येऊन कपडे, किराणा सामान, मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन जात असतं; पण हे सगळं तात्पुरतंच. कारण हा काही त्यांच्या समस्यांवर अंतिम पर्याय नाही, हे मी अनुभवलं. सध्या त्यांना शिकवत असताना त्यांच्या अडचणी जवळून दिसतात. मुलं हुशार आहेत, पण त्यांचं नियमित शाळेला जाणं होत नाही. शाळेतही त्यांना पुढल्या वर्गात पाठवण्याचं काम होतंय, पण त्यांचं किमान अध्ययन घडत नाही. शाळेचं दप्तर कुठं आहे ते माहिती नाही, पुस्तकं ठेवायला एखादं कपाटही नाही. जिथं राहायला धड घरं नाहीत, तिथं या अपेक्षा ठेवणं व्यवहारिक नाही हे मला नंतर उमगलं. दिवसभर लहान मुले आणि वृद्ध वस्तीवर असतात. बाकी सगळे कामासाठी सकाळी लवकर बाहेर पडतात ते रात्री माघारी येतात. तिथे गेल्यावर मुलांना दात घासायला लावण्यापासून सुरुवात करावी लागली, कारण स्वच्छतेशिवाय शिक्षण अपुरंच. मिश्र वयोगटातील ही मुलं शाळेला नियमित जात नाहीत, त्यामुळे अजूनही लिहिता-वाचताना त्यांना अडचणी येतात. त्यांची अशी स्वतःची कातकरी भाषा असल्याने मराठीतून शिकवत असताना त्यांना त्यांच्यातले एक होऊन समजून सांगावे लागते. सध्या त्यांच्या कातकरी भाषेत मराठी, हिंदी आणि कोकणी अशा सर्व शब्दांची युती पाहायला मिळते. एवढ्या वर्षांत त्यांच्या भाषेने काहीसे नवे रूप आत्मसात केले आहे. त्यांची बोलायची पद्धतही काहीशी वेगळी, पण मुलांचा शिकण्याचा उत्साह चांगला असतो, त्यामुळे कित्येक अडचणी आपोआप बाजूला होतात.

​एकीकडे शिक्षणाच्या अधिकारावर बोललं जातं, पण ते खरंच सर्वांपर्यंत पोहोचतंय का हेही पाहायला हवं. जोपर्यंत अशा बाजूला पडलेल्या समाजाच्या एका समूहाला आपण प्रवाहात सामावून घेणार नाही, तोवर ते मागासलेच राहतील. आपल्या गाड्या चकचकीत महामार्गावर धावतायत, पण त्यांची धडपड अजून पायवाटेवरच सुरू आहे. हे विसंगत वास्तव स्वीकारून प्रशासनानेही पुढे यायला हवं. त्यांना त्यांची ओळख द्यायला हवी. त्यांच्या नोंदी करून आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सहकार्य करायला हवे, म्हणजे त्यांनाही स्वतःचा विकास साधण्याच्या संधी उपलब्ध होतील.


- प्रा. सागर मच्छिन्द्र डवरी