प्रा. अनंत काकबा प्रियोळकर मराठी संशोधन क्षेत्रातील एक दीपस्तंभ

१३ एप्रिल, प्रा. अनंत काकबा प्रियोळकर यांची ५३वी पुण्यतिथी त्यानिमित्त हा लेख. प्रियोळकरांनी मराठी संशोधन क्षेत्राला जी शिस्त आणि दृष्टी दिली, ती आजही मार्गदर्शक ठरत आहे.

Story: विशेष |
11th April, 11:03 pm
प्रा. अनंत काकबा  प्रियोळकर मराठी संशोधन  क्षेत्रातील एक दीपस्तंभ

म​राठी साहित्य आणि संशोधन क्षेत्रात ज्या काही मोजक्या व्यक्तींनी आपल्या कार्याचा अजरामर ठसा उमटवला आहे, त्यांत प्रा. अनंत काकबा प्रियोळकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अ. का. प्रियोळकर यांचा जन्म गोव्यातील फोंडा तालुक्यातील 'प्रियोळ' या गावी ५ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत आणि सालाबाबत सरकारी दप्तरातील नोंदींमुळे बराच काळ संभ्रम होता; परंतु प्रियोळकरांनी स्वतः संशोधक वृत्तीने या विषयाचा पाठपुरावा करून आपली खरी जन्मतारीख निश्चित केली. प्रियोळकर यांच्यासह सहा भावंडांची नावे अशी : शांबा, त्रिवेणी, विनायक, अनंत, माणूक आणि यशवंत.

घरची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय असली, तरी संस्कारांची श्रीमंती मोठी होती. वडिलांकडून धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि त्यावरील भाष्य ऐकण्याची सवय त्यांना लहानपणापासून लागली. याच वातावरणामुळे त्यांच्या मनात मराठी वाङ्मयाची गोडी निर्माण झाली. औपचारिक शिक्षण मर्यादित असतानाही त्यांनी स्वतःच्या जिद्दीने आणि अभ्यासू वृत्तीने मोठी उंची गाठली. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीच्या काळात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. प्रियोळकरांच्या संशोधनाचा प्रवास अतिशय खडतर पण जिद्दीचा होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर विविध ठिकाणी नोकरी केली, पण त्यांचे मन संशोधनातच रमले. चिंतामण द्वारकानाथ देशमुख आणि अ. का. प्रियोळकर यांच्या प्रेरणेने व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने १ फेब्रुवारी १९४८ रोजी 'मराठी संशोधन मंडळा'ची स्थापना झाली. १ नोव्हेंबर १९५० ते ३१ डिसेंबर १९६६ या काळात ते संचालक होते. ते स्वतः पीएच.डी. नसूनही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. २९ मे २०२५ रोजी मला 'मराठी संशोधन मंडळा'त जाण्याचा योग आला. अ. का. प्रियोळकरांचे थोरले भाऊ विनायक काकबा प्रियोळकर यांचा मी पणतू असल्याने माझी तिथे विशेष खातीरदारी झाली.

प्रियोळकरांच्या कार्याचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे सतराव्या शतकातील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी लिहिलेल्या मराठी वाङ्मयाचे संशोधन होय. त्यांनी युरोपमधील रोम, लंडन आणि पोर्तुगालमधील ग्रंथालयांतून दुर्मिळ हस्तलिखितांच्या मायक्रोफिल्म्स मागवून घेतल्या आणि त्या काळातील मराठी भाषेचे स्वरूप जगासमोर मांडले. १९५८ साली प्रकाशित झालेला 'द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया' हा त्यांचा ग्रंथ मुद्रणकलेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. 'मुक्तेश्वरकृत महाभारत - आदिपर्व' (४ खंड): प्रियोळकरांनी मुक्तेश्वराच्या आदिपर्वाचे चार खंड शास्त्रीय पाठचिकित्सा पद्धतीने संपादित केले, जे १९५१ ते १९५९ या काळात प्रकाशित झाले. रघुनाथपंडित विरचित 'दमयंतीस्वयंवर' (१९३५): या काव्याची त्यांनी केलेली चिकित्सक आवृत्ती मराठीतील पाठचिकित्साशास्त्राचा एक आदर्श मानली जाते. 'दोलामुद्रिते' (Incunabula): मराठीतील आरंभीच्या काळातील छापील पुस्तकांचा वेध घेणारा हा ग्रंथ त्यांच्या संशोधक दृष्टीचा परिचय करून देतो. तसेच 'Goa Facts Versus Fiction' (१९६२) आणि 'Goa Rediscovered' (१९६७) ही त्यांची अन्य पुस्तके आहेत.

१९६१ साली प्रकाशित ‘The Goa Inquisition’ हे ऐतिहासिक संशोधनाच्या दृष्टीने सर्वाधिक चर्चित पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत झालेल्या धर्मछळ आणि अमानवीय प्रक्रियेवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. या ग्रंथाची मांडणी करण्यासाठी त्यांनी उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे, समकालीन पाश्चात्त्य लेखकांची टिपणे आणि पोर्तुगीज प्रशासकीय नोंदींचा सखोल आधार घेतला आहे. १५६० मध्ये गोव्यात सुरू झालेली ही धार्मिक चौकशी संस्था केवळ ख्रिस्ती धर्मांतरासाठीच नव्हे, तर स्थानिक संस्कृती, भाषा आणि धार्मिक परंपरा नष्ट करण्यासाठी कशी वापरली गेली, याचे वस्तुनिष्ठ चित्रण या पुस्तकात आढळते.

लेखकाने यात इन्क्विझिशनच्या न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांची पद्धत, शिक्षा देण्याचे क्रूर प्रकार आणि त्याचा गोमंतकीय समाजावर झालेला गंभीर परिणाम याचे मार्मिक विवेचन केले आहे. हे पुस्तक तत्कालीन धार्मिक कट्टरता आणि साम्राज्यवादी धोरणांचा काळा चेहरा जगासमोर आणते; त्यामुळेच आजही हे पुस्तक अभ्यासकांमध्ये अत्यंत आदराने पाहिले जाते.

प्रियोळकरांनी मराठीतील जुन्या काव्यांच्या 'पाठशुद्ध' आवृत्त्या काढण्यावर भर दिला. 'दमयंतीस्वयंवर'सारख्या काव्याची पाठचिकित्सा करताना त्यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. मराठीच्या बोलीभाषा, विशेषतः कोंकणी आणि गोमंतकी बोली, तसेच मराठी व्याकरण या विषयांतही त्यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच ‘लोकहितवादीकृत निबंध संग्रह’ आणि ‘हिंदुस्थानचे दोन दरवाजे’ ही त्यांची प्रमुख पुस्तके आहेत.

केवळ कोरडे संशोधन न करता प्रियोळकरांनी ललित लेखनही केले. 'प्रिय आणि अप्रिय' हा त्यांचा लेखसंग्रह त्यांच्या मिश्किल आणि मार्मिक लेखनाची साक्ष देतो. तसेच त्यांनी डॉ. भाऊ दाजी लाड, दादोबा पांडुरंग यांसारख्या एकोणिसाव्या शतकातील कर्तबगार महाराष्ट्रीयांची चरित्रे लिहून त्या काळातील सामाजिक इतिहासावर प्रकाश टाकला. प्रियोळकर हे केवळ ग्रंथप्रेमी नव्हते, तर त्यांना महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांचीही जाण होती. 'अखंड महाराष्ट्र' आणि 'बृहन्महाराष्ट्र' चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि या विषयावर महत्त्वपूर्ण लेखन केले.

१९५१ च्या कारवार येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी मराठी साहित्यातील आपले स्थान सिद्ध केले. प्रियोळकर हे अत्यंत शिस्तप्रिय आणि चिकाटीने काम करणारे संशोधक होते. "संशोधन म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर सत्याचा शोध घेणे" ही त्यांची धारणा होती. ते अत्यंत कष्टाळू आणि अभ्यासू होते. पुराव्यांवर आधारित लेखन, प्रसिद्धीपासून दूर राहणारा स्वभाव आणि विद्यार्थ्यांबाबत कडक पण उत्तम मार्गदर्शक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. नव्या पिढीत संशोधनाची आवड कमी होत चालली आहे, याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली होती.

वयाच्या ७७ व्या वर्षी, १३ एप्रिल १९७३ रोजी या महान संशोधकाचे निधन झाले. उद्या १३ एप्रिल, त्यांची ५३वी पुण्यतिथी त्यानिमित्त हा लेख. प्रियोळकरांनी मराठी संशोधन क्षेत्राला जी शिस्त आणि दृष्टी दिली, ती आजही मार्गदर्शक ठरत आहे. प्रियोळकर हे खरोखरच 'ज्ञानयोगी' होते. त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना संशोधनासाठी प्रेरणा देत राहील.


- आदित्य सिनाय भांगी, पणजी

 (लेख स्रोत - 'प्रा. अ. का. प्रियोळकर: व्यक्ती आणि कार्य' डॉ. वि. बा. प्रभुदेसाई)