सोंग

​गुरासारखा राब राब राबलो मी स्वतःच्या घरासाठी. प्रकाशच्या शिक्षणासाठी काय कमी काम नाही केलं लहानपणापासून! हॉटेलमधल्या पोऱ्याचं, कौलं शाकारण्याचं, माडावरून नारळ-सुपाऱ्या काढण्याचं... फुटपाथवर ओझं उचलण्याचं सुद्धा काम केलं.

Story: कथा |
11th April, 11:11 pm
सोंग

चार दिवस शहाण्यांच्या घरात चूल पेटली नव्हती. सुमतीबाई कोपऱ्यातल्या खाटेवर आडव्या पडून कण्हत होत्या. वेदनेने त्यांचे सारे अंग ठणकत होते. क्षीण झालेल्या शरीराने त्या तशाच उठत, कण्हतच विहिरीवरून आणून ठेवलेल्या कळशीकडे वळल्या.

​अचानक आलेल्या जोरदार खोकल्याची उबळ सहन न होऊन त्या कासावीस झाल्या. बाहेरच्या पडवीत फेऱ्या घालताना शहाणे खोकल्याच्या आवाजाने पटकन आत वळले. त्यांना पाहताच सुमतीबाईंनी कळशीकडे बोट केले. कळशीतून ग्लासभर पाणी ओतून घेत त्यांनी ग्लास त्यांच्या तोंडाला लावला.

​"पोटात अन्नाचा दाणाही नाही, त्यात हा खोकला त्रास देतोय," पाण्याचे काही घोट घेत त्या म्हणाल्या.

​"अजून कसा आला नाही प्रकाश...? निदान आज तरी येईल असं वाटलं होतं. बाज्या कुठे आहे...?" शहाण्यांच्या आधाराने कॉटवर आडव्या होत सुमतीबाई विचारत होत्या.

​"मी तरी काय सांगणार प्रकाशाचे...? गेले चार दिवस आम्ही जिवंत आहोत की मेलो हे पाहायलासुद्धा त्याला फिरकावंसं वाटलं नाही! बाज्या कुठेतरी काम मिळतंय का बघायला बाहेर गेलाय. येईल इतक्यात...!" असे म्हणत ते पडवीच्या दिशेने वळले. लांबून बाज्या येताना त्यांना दिसला.

​"काय रे, मिळालं का काही काम?" शहाण्यांनी प्रश्न केला. मानेनेच त्यांना नकार देत तो पडवीत येऊन बसला.

​शहाणे सुद्धा त्याला काही न विचारता पुन्हा फेऱ्या घालू लागले. काही दिवसांपूर्वी घरात झालेले वादाचे विषय चलचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यांपुढून सरकू लागले.

​"मी तुम्हाला एकदाच सांगून ठेवते, अशा तुमच्या जुनाट घरात या गावठी म्हाताऱ्या सासूसोबत राहणं मला दिवसेंदिवस कठीण होत चाललंय."

​"वहिनी! काय बोलतेस तू हे... तुझं तुला तरी समजतंय का?" बाज्याचा आवाज चढला होता.

​"आवाज खाली...!! कामधंदा वगैरे काही नसलेला तू आमच्या पैशावर जगतोयस. ही दोघं म्हातारा-म्हातारी तर बिनकामाची आहेत अगदी. म्हातारीला झेपत नाही म्हणून चूल फुंकताना ऐकू येणारी खोकल्याची उबळ आता रोजचीच झालीये. कान किटले अगदी माझे हे ऐकून! आणि सासरेबुवा, ते तर काय ध्यानच आहे अगदी. साधे कपडे सुद्धा नीट धुता येत नाहीत, वाळत घालता येत नाहीत आमचे..." प्रमिला चिडून बोलत चालली होती.

​"तरी पण ते करतात ना सगळं, येईल तसं.. होईल तसं..!" बाज्या उद्गारला.

​"उपकार नाही करत.. त्याबद्दल दोन वेळचं गिळतात ते..., फुकटचं! तुम्ही सर्व निरुपयोगी आहात."

​"वहिनी! प्रकाशच्या शिक्षणासाठी बाबांनी काय नाही केलं? पडेल ते काम केलं. मीही प्रकाश शिकावा म्हणून माझं शिक्षण पाचवीतच सोडलं. घरची परिस्थिती फार हलाखीची होती. बाबांनी मोठ्या हिमतीने त्याला शिकवलं, ऑफिसर केलं. ते हे दिवस पाहण्यासाठी?" बाज्या कळवळून बोलत होता.

​"त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं, फार काय केलं? आणि तू रे पुढे-पुढे बोलणारा... तू पण रिकामटेकडा आहेस," प्रमिला बाज्याकडे पाहून कुत्सितपणे हसत म्हणाली.

​"गुरासारखा राब राब राबलो मी स्वतःच्या घरासाठी. प्रकाशच्या शिक्षणासाठी काय कमी काम नाही केलं लहानपणापासून! हॉटेलमधल्या पोऱ्याचं, कौलं शाकारण्याचं, माडावरून नारळ-सुपाऱ्या काढण्याचं... फुटपाथवर ओझं उचलण्याचं सुद्धा काम केलं. पडेल ती कामं मी केली," दमल्यामुळे थोडा वेळ थांबून एक घोट पाणी पीत बाज्या पुन्हा बोलू लागला.

​"एकदा काम करताना निसटून पडल्यामुळे कसा कोण जाणे पण हृदयाला मुका मार बसला आणि झडपा कमकुवत झाल्या. डॉक्टरांनी असली कामे करू नका म्हणून सांगितलं. पण मी शिकलो नसल्याने इतर काम मला मिळेनासे झाले. पुन्हा ओझं उचलण्याचं काम सुरू केलं तर हृदयावर दबाव पडून छातीत दुखू लागलं. धाप लागल्यासारखी होऊ लागली. त्या काळात प्रकाशचे शिक्षण पूर्ण होऊन त्याला नोकरी लागली होती. त्याला आम्ही शिकवलं, लहानाचं मोठं केलं. आता आमच्या गरजेला आम्ही त्याच्याकडून मदतीची अपेक्षा केली तर चुकलं का आमचं...?" बाज्या पूर्ण बोलून झाल्यावर श्वास घेण्यासाठी थांबला.

​"माझंच चुकलं, तुमचं नाही. यायलाच नको होतं तुमच्यासारख्यांच्या तोंडाला लागायला.. शी...!" प्रमिला तोंड वेडावत म्हणाली. इतका वेळ चालू असलेला वाद ऐकू येत असूनही प्रकाश शांतपणे बसला होता.

​"पाहिलीस! पाहिलीस प्रकाश, कशी बोलतेय वहिनी आई-बाबांना?" बाज्या प्रकाशच्या जवळ जात म्हणाला.

​"हे पहा हो, मी सांगून ठेवते, यापुढे मला या घरात राहायचं नाही. बाहेर खोली घेऊया कुठेतरी..." प्रमिला प्रकाशला सांगत होती.

​"अगं पण.. ते जेवणार कसे? त्यांच्या पोटापाण्याचं काय?" प्रकाशचा प्रश्न.

​"डबा देत जाऊ एक वेळचा.. भिकारी समजून!" प्रमिला छद्मीपणे हसत म्हणाली.

​त्यावर प्रकाश काहीच बोलला नाही. प्रेमविवाह करून प्रमिला घरात आल्यापासून तो पुरता तिच्या अधीन झाल्यागत वागत होता. ती म्हणेल तसं सारं करत चालला होता. तिच्या सांगण्यावरून बॅगा भरून जवळपास सारं सामान सोबत नेत त्याने घर सोडले होते. त्याच गावात अपार्टमेंटमध्ये भाड्याने ब्लॉक घेऊन त्याने आपला संसार थाटला होता.

​आपल्या घराला, त्यातील माणसांना तो पूर्णपणे विसरला होता. उपकार म्हणून एक वेळचे अन्न डब्यात घालून घेऊन येत होता, तेही एका माणसापुरते. त्यातच भागवून तिघांच्या पोटाचा प्रश्न कसाबसा सुटत होता.

( क्रमश :)


- गौरी भालचंद्र