समुद्र हा निसर्गाचा अमूल्य खजिना असून 'मोती' हे त्याचे मौल्यवान दान आहे. प्राचीन काळापासून सौंदर्य आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या जैविक रत्नाचे जतन व संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.

समुद्र हा निसर्गाचा अमूल्य खजिना आहे व त्यातील 'मोती' हे त्याचे एक सुंदर व मौल्यवान दान. प्राचीन काळापासून मोत्यांना सौंदर्य, संपत्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. परंतु या मौल्यवान वस्तूच्या वाढत्या मागणीमुळे आज मोत्यांचे अति-शोषण ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे.
मोती हे समुद्रात किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या शिंपल्यांमध्ये तयार होणारे एक नैसर्गिक, जैविक रत्न आहे. मोती तयार होण्याची प्रक्रिया ही शिंपल्याने स्वतःच्या संरक्षणासाठी केलेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा शिंपल्यामध्ये बाहेरील वाळूचा कण, धूळ किंवा परकीय पदार्थ शिरतो, तेव्हा शिंपल्याच्या आतील मऊ भाग 'नॅक्रे' नावाचा एक चमकदार द्रव पदार्थ स्रवतो. शिंपला त्या बाह्य कणावर नॅक्रेचे एकावर एक अनेक थर जमा करतो. या पदार्थाला 'मदर ऑफ पर्ल' असेही म्हणतात. हा प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेटच्या स्फटिकांपासून बनलेला असतो. हळूहळू या पदार्थाचे थर त्या कणावर जमा होतात व कालांतराने या थरांचे रूपांतर एका गोल-चमकदार मोत्यात होते. थोडक्यात, वाळूच्या कणावर शिंपल्याने दिलेला स्राव म्हणजे मोती! ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या घडते म्हणूनच मोत्यांना स्वच्छ आणि संतुलित जलपरिसंस्थेचे निदर्शक मानले जाते.
परंतु आजकाल 'कल्चरड' मोती बनवण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. कल्चरड शेतीत शिंपले काही दिवस टँकमध्ये ठेवले जातात. टँकमध्ये ठेवल्यानंतर त्या शिंपल्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. पाण्यामध्ये वाढलेली शेवाळ व प्राण्यांची विष्ठा या शिंपल्यांना अन्न म्हणून दिले जाते. कल्चरड शेतीत नैसर्गिक वातावरण राखणे अधिक फायद्याचे असते, त्यामुळे कृत्रिम साधनांचा वापर टाळता येतो. जवळपास दीड ते दोन वर्षांनंतर या शिंपल्यांची पूर्ण वाढ होते. त्यानंतर यातील मोती बाहेर काढून मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. पण हल्ली कृत्रिम मोतीही तयार केले जातात. ते तयार करण्यासाठी शिंपल्यात शस्त्रक्रिया करून 'न्यूक्लियस' रोपण केले जाते. हे अत्यंत दुर्मिळ आणि महाग असतात. मानवी हस्तक्षेपाने हे शिंपल्यात तयार केले जातात. हे काच किंवा प्लास्टिकवर कोटिंग करून बनवलेले बनावट मोती असतात, जे खऱ्या मोत्यांसारखेच दिसतात.
मोती केवळ सौंदर्यासाठीच नव्हे तर सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहेत. अनेक सण-समारंभांमध्ये आणि विवाहसोहळ्यांमध्ये मोत्यांचे दागिने घालण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी मोती हे पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जातात. मोती हार, अंगठी, कानातले, नथ, बांगड्या यांसारख्या पारंपरिक दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. भारतात, विशेषतः गडचिरोलीसारख्या ठिकाणी नदीच्या शिंपल्यांपासून मोत्यांची शेती केली जाते. मोत्यांच्या वाढत्या मागणीमुळे आवश्यकतेपेक्षा जास्त आणि नियंत्रणाविना मोती काढून शिंपल्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. मोती तयार होण्यासाठी निरोगी शिंपले आवश्यक असतात. शिंपले पाण्यातील सूक्ष्म कण गाळून पाणी स्वच्छ ठेवतात. ज्या ठिकाणी मोती तयार होतात, तेथील पाणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असते. शिंपले नष्ट झाले तर मोत्यांचे उत्पादन कमी होईल. मोती हे निसर्गाचे अनमोल दान आहे. त्याचे अति-शोषण केल्यास केवळ समुद्री जीवसृष्टीच नव्हे तर मानवाचेही नुकसान होईल. त्यामुळे शाश्वत विकासासाठी मोत्यांचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)