नॅशनल स्टाफ सिलेक्शन आणि गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो. त्यामुळे जे गोमंतकीय सध्या स्टाफ सिलेक्शनची तयारी करत आहेत, त्यांनी SSC CGL परीक्षा द्यायला काहीच हरकत नाही.

भारताला भव्य समुद्रकिनारा लाभला आहे. पश्चिमेला गुजरातपासून खाली कन्याकुमारीपर्यंत आणि पुढे कलकत्त्यापर्यंत प्रचंड समुद्रकिनारा, बंदरे आणि बंदरांचे जाळे पसरलेले आहे. जगातील ८०% दळणवळण समुद्रमार्गे होते. जागतिक व्यापारावर प्रत्येक देशाच्या चलनानुसार व्यवसाय चालतो, ज्यामध्ये प्रामुख्याने युरो अथवा डॉलर्समध्ये देवाणघेवाण होते. प्रत्येक देश त्याच्या गरजेनुसार आयात-निर्यात धोरण आखत असतो. आयात म्हणजे वस्तू बाहेरून आपल्याकडे येणे, तर निर्यात म्हणजे आपली वस्तू बाहेरील देशांना पोहोचवणे.
हे व्यापार केवळ समुद्रमार्गेच नव्हे, तर हवाई मार्गाने म्हणजेच विमान व कार्गो वाहतुकीद्वारेही होतात. देशात बाहेरून येणाऱ्या मालावर 'कस्टम ड्युटी' नावाचा कर सरकारला द्यावा लागतो. डोमेस्टिक मार्केट आणि इंडस्ट्रीच्या दरांशी स्पर्धा होऊ नये म्हणून सरकार विचारपूर्वक हा कर लावते, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेला संरक्षण मिळते. काही लोक ही ड्युटी टाळण्यासाठी स्मगलिंगच्या माध्यमातून बेकायदेशीर पद्धतीने वस्तू आणण्याचा प्रयत्न करतात. अशा स्मगलिंगला पकडणे, प्रत्येक मालाची कसून तपासणी करणे, देखरेख करणे आणि बेकायदेशीर गोष्टींना पायबंद घालणे ही महत्त्वाची कामे 'एक्साईज' आणि 'कस्टम' अधिकाऱ्यांना करावी लागतात.
या अधिकाऱ्यांची निवड प्रामुख्याने दोन स्तरांवर होते. वरिष्ठ स्तरासाठी युपीएससी, तर कनिष्ठ दोन स्तरांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे परीक्षा घेतली जाते. यामध्ये ग्रुप A, B, C आणि D अशा रँकनुसार निवड होते. ग्रुप 'बी' ऑफिसर्स जसे की कस्टम इन्स्पेक्टर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आणि एक्झामिनर यांची निवड SSC CGL मधून केली जाते. हे विभाग भारताच्या वित्त मंत्रालयांतर्गत 'सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स' (CBIC) च्या कक्षेत येतात.
परीक्षा पद्धती आणि स्वरूप:
पात्रता:
कोणताही पदवीधर (Graduate) ज्याचे वय २१ ते ३० वर्षे आहे, तो या परीक्षेला बसू शकतो (आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत मिळते).
परीक्षेचे टप्पे:
ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) असून ती Tier I आणि Tier II अशा दोन टप्प्यांत होते.
विषय:
जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अॅप्टीट्यूड, इंग्रजी व्याकरण, इतिहास, भूगोल, पॉलिटी, अर्थशास्त्र, करंट अफेअर्स, भूमिती, डेटा इंटरप्रिटेशन आणि संगणक शास्त्र.
गुण:
Tier I परीक्षा क्वालिफाईंग असते. यात १०० प्रश्न असून एकूण २०० गुण असतात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते.
अधिकारी पदे आणि कामे:
१) प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर: हे अधिकारी अनेकदा पांढऱ्या गणवेशात असतात आणि प्रामुख्याने विमानतळ व बंदरांवर तैनात असतात.
२) एक्झामिनर: हे तपासणी अधिकारी म्हणून काम करतात.
३) इन्स्पेक्टर: कस्टम्स आणि सेंट्रल टॅक्स डिपार्टमेंटमध्ये समन्वयाचे काम पाहतात.
४) ग्रुप C: यामध्ये टॅक्स असिस्टंट, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफचा समावेश होतो.
संपूर्ण माहितीसाठी www.ssc.gov.in या संकेतस्थळावर 'वन टाइम रजिस्ट्रेशन' करणे आवश्यक असते. तिथे पदांचा पसंतीक्रम (Preference) द्यावा लागतो. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेतून देता येते. नॅशनल स्टाफ सिलेक्शन आणि गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो. त्यामुळे जे गोमंतकीय सध्या स्टाफ सिलेक्शनची तयारी करत आहेत, त्यांनी SSC CGL परीक्षा द्यायला काहीच हरकत नाही.

- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)