मी शिवाजीराजे भोसलेंचा पुतळा बोलतोय...

कसलीही पूर्वसूचना न देता, कोणाकडूनही परवानगी न घेता बिनबोभाटपणे पुतळा उभारण्यात आला. मुरगाव बंदर प्राधिकरणाने यावर आक्षेप नोंदवला तर त्यांना धर्मद्रोही, शिवद्रोही ठरवून काही मावळे म्हणविणारे मोकळे झाले. हे वर्तन कोणा मावळ्याकडून कदापि अपेक्षित नाही. उत्साहाच्या भरात, शिवरायांवरील प्रेमापोटी ती कृती घडून गेली असेलही. परंतु वस्तुस्थितीचे भान संबंधितांनी आणून दिल्यानंतर तरी डाेके ताळ्यावर यायला नको होते काय?

Story: वर्तमान |
11th April, 11:28 pm
मी शिवाजीराजे भोसलेंचा पुतळा बोलतोय...

वेदौलतीतील तमाम मावळ्यांनो, मी शिवाजीराजे भोसलेंचा पुतळा बोलतोय!

हल्लीच एक न्यायालयीन निकाल चर्चेत आला. परवानगी न घेता, आपखुशीने काही मावळ्यांनी​ शिवरायांचा एक पुतळा मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या जागेत उभारला. त्यावरून वाद झाला. पोलीस ठाणे आणि नगरपालिकेच्या स्तरावर संबंधितांची निराशा झाल्याने विवाद न्यायालयात पोहोचला. सुनावणी झाली. न्यायालयाने पुतळा उभारण्याची कृती बेकायदा ठरविली. तसेच पुतळा हटविण्याचे निर्देश जारी केले. या आदेशाने बरेच मावळे कष्टी झाले, जे स्वाभाविक होते. पण ते कायद्याच्या चौकटीत, वस्तुस्थितीस धरून आहे का? नाही! ते कसे, हे कळण्यासाठी त्यासंबंधीचे तटस्थ अवलोकन करायला हवे.

मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या हयातीत कधी​ही आपल्या कार्याचा बडेजाव मिरविला नाही. कुठल्याही किल्ल्याला आपल्या नावाची पाटी लावली नाही. किंवा त्यांच्या कोणत्याही सरदाराने अथवा सामान्य मावळ्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी ना फलक झळकविले, ना त्यांच्या प्रतिमांचा बाजार मांडला. आजच्या काळात विपरीत स्थिती आहे. आपणच मोठा निष्ठावान मावळा आणि हल्लीच्या रुळलेल्या भाषेत सांगायचे तर ‘कट्टर शिवरायभक्त’ भासवण्याची जणू सार्वजनिक स्पर्धाच लागलेली आहे. दरवर्षी गल्लीगल्लीत बॅनर आणि पुतळे उभारण्याची त्सुनामीच येते. शिवरायांवरील प्रेमापोटी हे सगळे होते हे मान्य. पण प्रत्यक्षात हे शिवरायांवरील प्रेम प्रत्येकाकडून कृतीत उतरवले जाते का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे.

‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये,’ अशी ताकीद महाराजांनी आपल्या सैन्याला दिली होती. ‘आपण सैन्यात आहाेत, स्वराज्यासाठी आपले प्राण तळहातावर घेऊन लढतो आहोत, म्हणजे आपण कसेही वागायला मोकळे,’ असे कोणाला वाटता कामा नये, असा लोककल्याणकारी विचार त्यामागे होता. पण मुरगावात तर थेट एका सरकारी यंत्रणेच्या जमिनीत घुसखोरी करण्यात आली. कसलीही पूर्वसूचना न देता, कोणाकडूनही परवानगी न घेता बिनबोभाटपणे पुतळा उभारण्यात आला. मुरगाव बंदर प्राधिकरणाने स्वाभाविकपणे यावर आक्षेप नोंदवला तर त्यांना धर्मद्रोही, शिवद्रोही ठरवून काही मावळे म्हणविणारे मोकळे झाले. हे वर्तन कोणा मावळ्याकडून कदापि अपेक्षित नाही. उत्साहाच्या भरात, शिवरायांवरील प्रेमापोटी ती कृती घडून गेली असेलही. परंतु वस्तुस्थितीचे भान संबंधितांनी आणून दिल्यानंतर तरी डाेके ताळ्यावर यायला नको होते काय? ज्या लोकप्रतिनिधींनी​ समाजाला चांगल्या-वाईटातील योग्य काय, याची निवड करण्यासाठी मार्गदर्शन करायचे असते, त्यांनी उलट चिथावणीखोरीची भाषा केली. हे शिवप्रेमाचे द्योतक आहे काय? आपला राजकीय पक्ष, आपली विचारसरणी तुमच्यासाठी महत्त्वाची असेलही, त्या पक्ष-विचारसरणीची ध्येये जरुर पुढे न्यावीत. पण त्याला अशा आततायीपणाची जोड देऊन कायदा धाब्यावर बसवत असाल, तर लोकप्रतिनिधींची व्याख्या नव्याने ठरवावी लागेल!

या सर्व प्रकरणात गोवास्थित उच्च न्यायालयाने डोळ्यांत अंजन घालणारा निकाल देऊन अतिउत्सवी, अतिउत्साही आणि सर्वच बाबतीत अति करणाऱ्यांचे विमान काही​ प्रमाणात जमिनीवर आणले. पुतळा उभारताना झालेले अतिक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या कुठल्याच यंत्रणेने मदत तर केली नाहीच, उलट अतिक्रमण करणाऱ्यांसोबत अप्रत्यक्षपणे संगनमत केले, असे गंभीर निरीक्षण न्यायालयाने नोंद केले. केवळ राजकीय नेत्याच्या हट्टापायी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा न्यायालयाच्या आदेशानंतर हटवण्याची नामुष्की आता ओढवली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर तरी शिवरायप्रेमींनी प्रगल्भपणे व्यक्त होणे अपेक्षित होते. पण कसले काय? एका धार्मिक संघटनेतर्फे जे निवेदन प्रसृत करण्यात आले, ते पाहता, हा निवाडा देणाऱ्या न्यायाधीशांनीही डोक्याला हात लावला असेल. कारण हा निवाडा यापुढील काळात पुतळ्यांबाबत सर्वांनीच कशा प्रकारे संवेदनशील, सजग राहायला हवे, याचे उत्कृष्ट दिशानिर्देशन करणारा आहे. मात्र या ​धार्मिक संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, बेकायदा ठरविण्यात आलेला मुरगावातील पुतळा म्हणे मुरगाव बंदर प्राधिकरणाने न हटवता आहे त्या स्थितीत जतन करून ठेवायला हवा. हे पालथ्या घड्यावर पाणीच नव्हे काय? ज्या निवाड्यातून बोध घेऊन अशा संघटनांनी तो पुतळा स्वयंस्फूर्तीने कायदेशीर साेपस्कार पूर्ण करून त्याची योग्य जागी पुन:स्थापना करणे अपेक्षित हाेते, त्याच्या उलट ही मागणी आहे. तशी कृती घडली असती, तर नक्कीच त्या संघटनेची शिवप्रेमींत वाहवा झाली असती. पण तसे घडत नाही. वेळ अजूनही गेलेली नाही, न्यायालयाचा मान राखून पुतळ्याबाबत आदर्शवादी भूमिका घेण्याची संधी अशा शिवप्रेमींनी जरुर साधायला हवी!

या एकूणच प्रकरणात एक गोष्ट फारच जिव्हारी लागली. शिवाजी महाराज असो की संभाजी महाराज, या दोघांचा ओझरता जरी​ उल्लेख आला, तरी गोव्यातील अपवाद वगळता विशिष्ट वर्गातील अनेक जण अकारण एकेरीवर येतात. या दोघांचे गोव्यासाठी योगदान काय? त्यांचे पुतळे इथे कशाला? असे प्रश्न उपस्थित करून विरोधाचे कडवे सूर आळवले जातात. याला कारण एक म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीचा द्वेष. दुसरे म्हणजे या दोन्ही विभूतींचा आक्रमक धार्मिक, राजकीय प्रचार. या दोन्ही गोष्टींमुळे बिथरलेल्यांकडून हा प्रमाद उघडपणे घडताना दिसतो. जिज्ञासूंनी हल्ली गोव्यातील कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या फेसबुक पेजवरील पुतळ्यासंबंधीच्या पोस्टवर व्यक्त झालेल्या कमेंट्स अभ्यासाव्यात. त्यातील शाब्दिक विखार जितका धोकादायक आहे, त्यापेक्षा त्यांच्यातील शिवराय आणि शंभूराजेंविषयीचे घोर अज्ञान चिंताजनक आहे. ही अज्ञानाची दरी कशी मिटवणार, हे समाजधुरीणांनी आणि राजकीय नेत्यांनी ठरवावे. काही राजकारण्यांना तर अल्पसंख्याक घटकांचा हा आक्रमक विरोधच हवासा वाटत असावा. कारण त्याचे भांडवल करून हिंदू लोकांचे ध्रुवीकरण करणे सोपे होते. किमान शिवरायांच्या जयंतीला पुतळ्यांसमोर मस्तक झुकवणाऱ्यांनी तसे करता नये. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात शिव-शंभूंनी गोव्याविषयी दिलेल्या योगदानाची अस्सल माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे मुळीच कठीण नाही. शालेय अभ्यासक्रमात या दोन्ही राजांनी गोव्यासाठी दिलेल्या योगदानाचे बाळकडू तर सर्वांना पाजायला हवे. प्रसंगी धर्मधुरीणांचीही मदत घ्यायला हवी. शिवाजी महाराज आम्हाला समजले, पण सर्वांना ते समजावेत, यासाठी आम्ही कधी झटणार? ती वेळ आता आली आहे. सरकारने तर त्यासाठी अग्रभागी राहून कार्य करायला हवे!

राहता राहिला प्रश्न आम्हा पुतळ्यांचा. गेल्या दहा-पंधरा वर्षांत गोव्यात शिवरायांच्या शेकडो पुतळ्यांची स्थापना झाली. अजूनही होते आहे. ती यापुढेही राहावी. पण त्याला कायद्याचे कोंदण आणि समाजमान्यतेचे बंधन दोन्ही​ असायला हवे. प्रत्येक मोकळ्या जागेत पुतळा उभारायलाच हवा असे नाही. त्यातून वादच जन्माला येतात. काेणाच्या तरी भावना दुखावून, कोणाला तरी विशिष्ट हेतूने धाक दाखविण्याच्या हेतूने शिवरायांच्या पुतळ्यांचा वापर होता नये. कुठल्याच पुतळ्याच्या बाबतीत वादाचे गालबोट यापुढे लागू नये, याची खबरदारी प्रत्येक मावळ्याने घ्यावी. अवघ्या हयातीत आपल्या रयतेच्या बाबतीत हिंदू-मुसलमान असा भेदाभेद कदापि न करणाऱ्या सर्वसमावेशक राजाविषयी तरी हा करंटेपणा कोणी करू नये, ही एका पुतळ्याची कळकळीची विनंती!


- सचिन खुटवळकर, (लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)