हल्ल्यात तेलांचे गोदाम, इंधन टाक्या उद्ध्वस्त, नागरिक भयभीत

तेहरान : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने नवव्या दिवशी अत्यंत रौद्र रूप धारण केले आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या तेल रिफायनरी आणि गोदामांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात तेलांचे ३ गोदाम आणि ३० हून अधिक इंधन टाक्या उद्ध्वस्त झाल्या असून, इराणचा तेल पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
तेहरानमध्ये तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये तेल मिसळल्याने रस्त्यांवर आगीच्या नद्या वाहत असल्याचे भयानक दृश्य पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, वातावरणातील तेलाच्या अंशामुळे शहरात काळ्या पावसाची नोंद झाली असून, नागरिक भयभीत झाले आहेत.
युद्धात १,४८३ लोकांचा मृत्यू
या युद्धात आतापर्यंत १,४८३ लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो जखमी झाले आहेत. ५,५०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची स्थिती आता ‘लूजर’ (पराभूत) देशासारखी झाल्याची टीका केली आहे. अमेरिका आणि इस्रायल आता इराणचा युरेनियमचा साठा ताब्यात घेण्यासाठी विशेष लष्करी मोहीम राबवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
या वाढत्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला असून, चीन आणि कतारने तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, संघर्ष थांबण्याऐवजी संपूर्ण मध्यपूर्वेला आपल्या विळख्यात घेताना दिसत आहे.
भीषण ‘पाणी टंचाई’चे संकट
पर्शियन खाडीत सुरू असलेल्या वाढत्या लष्करी तणावामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर आता कच्च्या तेलापेक्षाही मोठे संकट उभे राहिले आहे. युद्ध अधिक तीव्र झाल्यास या क्षेत्रातील देशांना भीषण ‘पेयजल’ टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. खाडीतील अनेक देश पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करणाऱ्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पांवर अवलंबून आहेत आणि हे प्रकल्प सध्या युद्धाच्या छायेत आहेत.
इराणकडून पाच देशांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव
इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या आयआरजीसीने सौदी अरेबिया, कुवैत, बहरीन आणि यूएई या पाच देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले चढवले आहेत. आम्ही पुढील सहा महिने सलग युद्ध लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा इराणने दिला आहे. दरम्यान, इस्रायलने इराणची अनेक 'एफ-१४' लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणा नष्ट केल्याचा दावा केला आहे.