गोमेकॉत दोन वर्षांत ४ हजारांहून अधिक अँजीओप्लास्टी

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे : दिवसाला सरासरी ५ अँजीओप्लास्टी, १ बायपास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th March, 11:40 pm
गोमेकॉत दोन वर्षांत ४ हजारांहून अधिक अँजीओप्लास्टी

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) कार्डीओलॉजी विभागाने २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल ४,१०८ अँजीओप्लास्टी आणि ७६० बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. याचाच अर्थ, गोमेकॉत दररोज सरासरी ५ हून अधिक अँजीओप्लास्टी आणि किमान १ बायपास शस्त्रक्रिया केली जात आहे. विधानसभेत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार क्रूझ सिल्वा यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, गोमेकॉत २०२४ मध्ये ३,८१० वेळेस अँजीओग्राम करण्यात आले. त्यावर्षी एकूण १९०१ अँजीओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर १७४ पेसमेकर बसवण्यात आले. याशिवाय हृदयाशी संबंधित अन्य ११५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये एएसडी, व्हिएसडी क्लोजर, सीआरटी, एफएफआर, पीजी रिप्लेसमेंट, कार्डियाक कॅथ अशा विविध शस्त्रक्रियांचा समावेश होता. महिन्यानुसार पाहता जुलै २०२४ मध्ये सर्वाधिक ५९५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
वर्ष २०२५ मध्ये गोमेकॉत ४,२११ वेळेस अँजीओग्राम करण्यात आले. त्यावर्षी एकूण २,१९० अँजीओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर २०० पेसमेकर बसवण्यात आले. हे वगळता हृदयाशी संबंधित अन्य ६५१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०२६ च्या पहिल्या दोन महिन्यात गोमेकॉत हृदयाच्या संबंधित १,३५८ शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत. यामध्ये ८१८ वेळेस अँजीओग्राम करण्यात आले. तर ४१९ अँजीओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.
एका महिन्यात ४९ बायपास
गोमेकॉत २०२४ मध्ये ३९२ तर २०२५ मध्ये ३६८ बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये जुलै २०२४ या एका महिन्यातील सर्वाधिक ४९ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. वर्ष २०२६ मध्ये २० फेब्रुवारीपर्यंत ५२ बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
महिन्याला सरासरी ४५ लाख खर्च
उत्तरात म्हटले आहे की, गोमेकॉत एका अँजीओप्लास्टी शस्त्रक्रियेसाठी सरासरी ४० हजार रुपये खर्च येतो. यामध्ये औषधांचाही समावेश आहे. तर हृदयशस्त्रक्रियांसाठी महिन्याला सरासरी ४५ लाख रुपये खर्च येतो. तर औषधे आणि कॅथ लॅबसाठी महिन्याला सरासरी ७५ लाख रुपये खर्च येतो.                          

हेही वाचा