म्हणाले-'तो' हेतू नव्हता!

पणजी: विधानसभेत शुक्रवार ६ मार्च रोजी घडलेल्या प्रकाराबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी सभागृहाची बिनशर्त माफी मागितली. आपला सभागृहाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. निषेध फलक दाखवणाऱ्या व्यक्तींना प्रवेशिका (पास) आपल्या कार्यालयाने दिल्या असल्या, तरी त्यांचा हेतू आपल्याला माहिती नव्हता, असे त्यांनी नमूद केले. सभागृहाच्या नियमांनुसार प्रवेशिका देणाऱ्या व्यक्तीला अशा कृत्यांसाठी जबाबदार धरता येते का, यावर चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली.
सरदेसाई म्हणाले की, "मला लोकशाही, हे सभागृह तसेच सभापतींविषयी नितांत आदर आहे. मी १४ वर्षे आमदार म्हणून कार्यरत आहे; तसेच मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. मी सभागृहाच्या कामकाजाबाबत अत्यंत गंभीर आहे. माझ्यावर कामकाजात व्यत्यय आणल्याचा आरोप करण्यात आला, मात्र या संदर्भात झालेल्या चौकशीची माहिती मला देण्यात आली नाही. यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे उल्लंघन झाले आहे. मला जबाबदार ठरवण्यापूर्वी माझे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते."
ते पुढे म्हणाले, "मी एक लोकप्रतिनिधी आहे. केवळ माझ्या मतदारसंघातीलच नव्हे, तर राज्यभरातील लोकांच्या समस्या ऐकून त्या विधानसभेत मांडणे हे माझे कर्तव्य आहे. ६ मार्च रोजी घडलेली घटना योग्य नव्हती. मी त्यांना प्रवेशिका दिल्या असल्या, तरी ते सभागृहात येऊन कसे वागतील याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही, किंवा तसा सभागृहाचा कोणताही नियम नाही. जर मला गोंधळच घालायचा असता, तर मी स्वतःच्या नावावर प्रवेशिका दिल्या असत्या का, याचाही विचार व्हावा. त्यांचा हेतू माहिती असता, तर मी त्यांना प्रवेशिका दिल्याच नसत्या. तरीही नैतिक जबाबदारी स्वीकारून मी या सभागृहाची माफी मागतो."