
पणजी : दिल्लीहून (Delhi) गोव्याकडे (Goa) येणाऱ्या अकासा एअरच्या (Akasa Air) विमानात प्रवाशाने शौचालयात विडी ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विमानातील (flight) प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील (Delhi) रहिवासी असलेला आशिष नावाचा प्रवासी (Passenger) शनिवारी अकासा एअरच्या क्यूपी१६२५ (QP1625) या विमानाने दिल्लीहून गोव्याकडे प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने विमानाच्या शौचालयात विडी ओढल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान त्याच्याकडे लाईटरही आढळून आले. ज्यामुळे विमानातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकाराची माहिती मिळताच विमान कर्मचाऱ्यांनी तत्काळ आवश्यक प्रोटोकॉल पाळून परिस्थिती नियंत्रणात आणली. गोव्यात मोपा विमानतळावर विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी गोव्यातील मोपा विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच नागरी विमान सुरक्षेविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये रोखण्याच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अकासा एअरनेही या घटनेची पुष्टी केली. विमानातील कर्मचाऱ्यांनी नियमांनुसार कारवाई केल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.