वास्कोतील प्रकार : मुरगाव मामलेदार, वास्को ‘एईआरओ’ची तक्रार

वास्को : पोर्तुगीज नागरिकत्व मिळविले असतानाही एसआयआर अंतर्गत अर्जावर माहिती देताना सदर नागरिकत्वाची माहिती जाणूनबुजून लपविल्याप्रकरणी भुटेभाट येथील एका महिलेविरोधात वास्को पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. सदर तक्रार मुरगावचे मामलेदार व वास्को विधानसभा मतदार संघाचे एईआरओने केली आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी सदर महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे. तसेच तिने पोर्तुगीज नागरिकत्व मिळविले आहे. तथापि एसआयआर अंतर्गत तिने खोटी माहिती पुरविली. तिने बूथस्तरिय अधिकारी मार्फत मुरगावच्या मामलेदारांसमोर सादर केलेल्या अर्जामध्ये सदर माहिती उघड केली नाही. तिने जाणूनबुजून खरी माहिती लपविण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे बनावट कागदपत्रे खरे असल्याचे सादर करून व वास्को विधानसभा मतदार यादीत बनावट पद्धतीने आपले नाव नोंदवून अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा गुन्हा केला. याप्रकरणी दखल घेताना तिच्याविरोधात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक निखिल नाईक देसाई पुढील तपास करीत आहेत.