पणजी महापालिकेसाठी उद्या मतदान; ६९ उमेदवार आजमावणार भवितव्य

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
57 mins ago
पणजी महापालिकेसाठी उद्या मतदान; ६९ उमेदवार आजमावणार भवितव्य

पणजी : पणजी (Panjim) महापालिका निवडणुकीसाठी उद्या ११ मार्च रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत बजावता येणार आहे. महापालिकेच्या ३० प्रभागांसाठी ६९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

यातील २३ प्रभागात थेट दुहेरी लढत होईल. अन्य सहा प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ५ उमेदवार लढणार आहेत. मतमोजणी १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे सुरू होईल. मतमोजणी झाल्यावर १३ मार्च रोजीच निकाल जाहीर केला जाणार आहे. 

महापालिका (Muncipal Corporation) निवडणुकीत (Election) १५ हजार २२५ पुरुष तर १७ हजार २७१ महिला अशा एकूण ३२ हजार ४९६ मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक १६१७ तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वात कमी ८२८ मतदार आहेत.

२३ प्रभागात भाजप समर्थित मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे पॅनल व उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार’ यांच्या पॅनलमध्ये थेट दुरंगी लढत होणार आहे. बाबूश यांच्या पॅनलने २० फेब्रुवारी रोजी सर्व ३० उमेदवारांची नावे जाहीर केली होती. 

‘आमी पणजेकार पॅनल’ने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३० उमेदवारांची नावे जाहीर केली होती.  उमेदवारांवर दबाव येऊ नये यासाठी नावे उशिरा जाहीर करण्यात आल्याचे ‘आमी पणजेकार पॅनल’ने स्पष्ट केले होते.

प्रचार कालावधीत ‘आमी पणजेकार पॅनल’तर्फे कॅसिनो संबंधित समस्या, पार्किंग व शहरातील अन्य समस्यांवर भर देण्यात आला. तर बाबूश पॅनलतर्फे मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर भर देण्यात आला. ‘आमी पणजेकार पॅनल’ला आम आदमी पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांनी या पॅनलच्या उमेदवारांसाठी घरोघरी प्रचारात भाग घेतला होता.

हेही वाचा