वाढत्या गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा पर्यटन मंत्र्यांचा इशारा

पणजी: सोशल मीडियाच्या प्रभावामुळे गोव्यात येणाऱ्या काही तरुण पर्यटकांमध्ये आपण कसेही वागू शकतो, अशी चुकीची धारणा निर्माण झाली असून, ही बेशिस्त आता खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभा अधिवेशनात दिला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पर्यटकांच्या अशा गैरवर्तनामुळे राज्याच्या प्रतिमेला तडा जात असून, यापुढे दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलली जातील.
सभागृहात माहिती देताना मंत्र्यांनी समुद्रकिनाऱ्यांवरील काही धक्कादायक प्रकारांकडे लक्ष वेधले. अनेकदा तरुण पर्यटक परदेशी पर्यटकांसोबत त्यांच्या संमतीशिवाय सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा घटनांमुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, समुद्रकिनाऱ्यांवर अंमलबजावणी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने आता पर्यटन पोलीस दलाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस स्थानकांच्या समन्वयाने समुद्रकिनाऱ्यांवर अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले जातील, जेणेकरून पर्यटकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येईल. विशेष म्हणजे, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि देखरेखीसाठी पर्यटन पोलीस दलात महिला कॉन्स्टेबल्सची संख्या वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडच नव्हे, तर गरजेनुसार अटकेची कारवाई करण्याचे निर्देशही विभागाला दिले आहेत. गोव्याची पर्यटन संस्कृती जपण्यासाठी आणि पर्यटकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे खंवटे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.