हजारोंच्या साक्षीने पारंपरिक सोहळा : आमदार डॉ. देविया राणे यांच्याकडून विधिवत पूजन

वाळपई : सत्तरी तालुक्यातील ठाणे येथे सात भावांच्या पारंपरिक त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. रात्रभर रंगलेल्या या सोहळ्यात १४ घोड्यांचा भव्य नृत्याविष्कार सादर करण्यात आला. घोडेमोडणी उत्सव ठाणे-सत्तरी येथील मंडळगिरो–कोळगीरो मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उत्सवाची सांगता रविवार, ८ मार्च रोजी पहाटे करण्यात आली.
ठाणे येथील मंडळगिरो–कोळगीरो देवस्थानचा हा त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. ठाणे पंचक्रोशीतील सात गावांतील नागरिक व भाविकांच्या उपस्थितीत हा पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आला. १४ घोड्यांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी गोव्याच्या विविध भागांसह कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
उत्सवात गोव्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. आमदार डॉ. देविया राणे यांनी उपस्थित राहून सर्व घोड्यांचे विधिवत पूजन केले. त्यांनी या पारंपरिक उत्सवात सहभागी होत देवदर्शनाचाही लाभ घेतला.
देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी
मंडळगिरो–कोळीगीरो देवस्थानच्या दर्शनासाठी दुपारपासूनच भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. हजारो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. सुंदर नियोजन आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. मंडळगिरो–कोळीगीरो मैदान हे विस्तीर्ण पठार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीत या पारंपरिक उत्सवाची सुरुवात संध्याकाळी ३ वाजता करण्यात आली.
घोड्यांची ‘हातभेट’ ठरली महत्त्वाचा क्षण
या घोडेमोडणी उत्सवात एकूण १४ घोड्यांचा समावेश असतो. विविध देवस्थानांतील घोडे तयार करून भाविकांच्या उपस्थितीत घोडेमोडणी स्थळी आणले जातात. ठाणे देवस्थानतर्फे त्यांचे पारंपरिक व धार्मिक पद्धतीने स्वागत करण्यात येते, ज्याला ‘हातभेट’ असे म्हटले जाते. ही हातभेट पाहण्यासाठी भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पारंपरिक वादनाच्या गजरात शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून हा सोहळा पार पडला. विविध भागांतून आलेल्या घोड्यांचे विधिवत पूजन करून त्यांना या उत्सवात सहभागी करून घेण्यात आले.
पाच वाजल्यापासून १४ घोड्यांचा नृत्याविष्कार
शनिवार संध्याकाळी ५ वाजल्यापासून १४ घोड्यांचा भव्य नृत्याविष्कार सुरू झाला. घोड्यांच्या मागोमाग मोठ्या संख्येने भाविक या नृत्याविष्कारात सहभागी झाले. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
तीन तास नवस फेडण्याचा कार्यक्रम
या उत्सवामध्ये सार्वजनिक ‘सांगणे’ घालण्याची पद्धत आहे. विविध कारणांसाठी देवाला नवस करून गार्हाणे घालण्याची परंपरा येथे प्रचलित आहे. ‘हाकेला पावणारा मंडळगिरो–कोळीगीरो’ अशी या देवस्थानाची आख्यायिका आहे. सुमारे तीन तास नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडला.
आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या की, ठाणे-सत्तरी येथील सात भावांची घोडेमोडणी हा या भागातील परंपरागत व वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. या उत्सवात गोव्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. सात गावांचे ऐक्य या उत्सवातून दिसून येते. ही परंपरा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी
या त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सवात अनेक भाविक आपल्या विविध मनोकामनांसाठी देवाला नवस करतात. हा नवस घोडेमोडणी उत्सवात फेडण्याची परंपरा आहे. देवाला भाविकांनी विविध साहित्य अर्पण केले. जवळपास तीन तास नवस फेडण्याचा कार्यक्रम मैदानावर सुरू होता.