बेताळभाटी ग्रामसभेत सीझेडएमपी आराखड्यावर चर्चा; मसुद्यातील त्रुटींवर नागरिकांच्या हरकती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th March, 01:29 pm
बेताळभाटी ग्रामसभेत सीझेडएमपी आराखड्यावर चर्चा; मसुद्यातील त्रुटींवर नागरिकांच्या हरकती

मडगाव: बेताळभाटी येथे रविवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत 'कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन' (CZMP) आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या आराखड्यात मच्छीमारांच्या झोपड्या, क्रॉस (खुरीस) आणि वाळूच्या टेकड्यांचा समावेश नसल्याच्या गंभीर त्रुटी नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्या. याशिवाय, ग्रामसभेत पंचायतीच्या अर्थसंकल्पावर चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात आली.

सरपंच मिनू फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा पार पडली. यावेळी ग्रामविकास समितीचे माल्कम अल्फोन्सो यांनी सीझेडएमपी आराखड्यातील बदलांची माहिती दिली. सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले की, पंचायतीचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार त्यात योग्य बदल करून तो मंजूर करण्यात आला आहे. तसेच वार्षिक विकास आराखड्यावरही चर्चा करून त्यास संमती देण्यात आली. गावात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'ॲनिमल बर्थ कंट्रोल' (ABC) समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती एका एजन्सीसोबत करार करून काम करणार आहे.

ग्रामसभेत प्रामुख्याने सीझेडएमपी आराखड्याच्या नव्या मसुद्यावर चर्चा झाली. पूर्वीचा आराखडा आणि आताचा नवा मसुदा यांमधील बदल ग्रामस्थांसमोर मांडण्यात आले. यात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले असून नागरिकांनी त्यावर हरकती नोंदवल्या आहेत. या आराखड्यात मच्छीमारांच्या झोपड्या, सखल व पाणथळ भाग आणि वाळूच्या टेकड्या योग्य प्रकारे दाखवण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वाळूच्या टेकड्या आहेत, तिथे रस्ते नसतानाही ते आराखड्यात दर्शवण्यात आले आहेत. या सर्व त्रुटींबाबत सीझेडएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात येणार असल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा