
वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या (USA) लष्कराने इराणच्या १६ नौका नष्ट केल्याचा दावा केला आहे. या नौका सामुद्रधुनीत सागरी मायन्स (स्फोटके) टाकण्यासाठी वापरल्या जाऊ शकत होत्या, अशी माहिती अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी असलेल्या होर्मूझ (Strait of Hormuz) परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांकडने (United States Central Command (CENTCOM) सांगितले की, या नौका आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसाठी संभाव्य धोका निर्माण करू शकत होत्या. गुप्तचरांच्या माहितीनुसार, इराणी दल लहान बोटींचा वापर करून सामुद्रधुनीत सागरी मायन्स टाकण्याची तयारी करत होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्याने त्या नौकांवर हल्ले करून ती नष्ट केली.
पेंटागॉनने या कारवाईचे काही व्हिडिओ फूटेजही प्रसिद्ध केले असून, ही कारवाई जागतिक सागरी वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी इराणला सामुद्रधुनीतून तात्काळ मायन्स हटवण्याचा इशारा दिला होता. जर आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
२० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक
होर्मूझ ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची सामुद्रधुनी मानली जाते. जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल या मार्गाने दररोज वाहून नेले जाते. त्यामुळे येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जागतिक व्यापार, ऊर्जा बाजारपेठ आणि जहाजवाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
मध्यपूर्वेतील संघर्ष वाढला
दरम्यान, मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होत असून, इराण (Iran) आणि इस्त्रायल (Israel) यांच्यातील तणावामुळे अनेक देश या संघर्षात ओढले जात आहेत. गल्फ प्रदेशातील काही देशांमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या घटनाही नोंदवण्यात आल्या आहेत.
या परिस्थितीचा परिणाम जहाजवाहतुकीवरही होत असून, अनेक शिपिंग कंपन्यांनी हल्ल्यांच्या भीतीमुळे आपली जहाजे दुसऱ्या मार्गाने वळवण्यास सुरूवात केली आहे. वाढत्या तणावामुळे जागतिक तेलाच्या किमतीतही चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे.
तज्ञांच्या मते, होर्मूझ सामुद्रधुनी परिसरातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली असून, पुढील काही दिवसांत लष्करी कारवाया वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.