वडिलांचे सातवे लग्न रोखण्यासाठी पुत्राची पोलिसांना विनवणी

लग्नाला विरोध करीत असल्याने मुलाला मारहाण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
वडिलांचे सातवे लग्न रोखण्यासाठी पुत्राची पोलिसांना विनवणी

वाराणसी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आझमगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ५५ वर्षीय अंशतः पक्षाघातग्रस्त वडिलांनी (Father) सातवे लग्न करण्याचा हट्ट धरल्याने त्याला विरोध करणाऱ्या १७ वर्षीय मुलाला (Son) मारहाण केल्याचा प्रकार घडला. अखेर त्रस्त झालेल्या मुलाने अहरौला पोलिस स्थानकात (Police Station) धाव घेत लग्न रोखत न्याय देण्याची विनवणी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमरजीत मौर्य असे संबंधित व्यक्तीचे नाव असून; आतापर्यंत सहा विवाह केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याची पहिली पत्नी लग्नानंतर काही दिवसांतच मरण पावली.

तर दुसरी पत्नी तीन मुलींना जन्म दिल्यानंतर निधन पावली. उर्वरीत चार पत्नींनी, ज्यामध्ये या अल्पवयीन मुलाची आईही आहे. अमरजीतने त्याच्या जमिनीचा हिस्सा त्यांच्या नावावर करण्यास नकार दिल्यामुळे वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आई घर सोडून गेल्यानंतर वडिलांनी पुन्हा लग्न करण्यासाठी कुटुंबाची जमीन गहाण ठेवून कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला मजुरी करण्यास भाग पाडले जात आहे. सातवे लग्न करण्याच्या वडिलांच्या निर्णयाला विरोध केल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली.

या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत चौकशी सुरू केली असून; अल्पवयीन मुलाच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा