सोमवारी समोर आली होती गंभीर जखमी झाल्याची बातमी; त्यानंतर कोणतीही माहिती जारी झाली नाही..

तेहरान: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत सध्या जगभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या सोमवारी पदभार स्वीकारल्यापासून मोजतबा खामेनेई सार्वजनिकरीत्या कुठेही दिसलेले नाहीत किंवा त्यांनी देशाला उद्देशून साधे निवेदनही प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे ते युद्धात गंभीर जखमी झाल्याच्या चर्चांना उधाण आले असून इराणमधील राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.
मोजतबा खामेनेई हे दिवंगत सर्वोच्च नेते अयातूल्ला अली खामेनेई यांचे पुत्र आहेत. गेल्या २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई यांच्याकडे इराणची धुरा सोपवण्यात आली. मात्र, पदभार स्वीकारल्यापासून ते 'पडद्याआड' असल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित केली जात आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे पुत्र युसेफ पेझेश्कियान यांनी टेलिग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले. युसेफ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मोजतबा खामेनेई जखमी झाल्याची बातमी त्यांनी ऐकली होती, परंतु निकटवर्तीयांकडे चौकशी केली असता ते सुरक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तरीही, त्यांनी या जखमेच्या स्वरूपाबद्दल कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.
दुसरीकडे, अमेरिकेतील नामांकित वृत्तसंस्था 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने इराणमधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने धक्कादायक माहिती दिली आहे. या अहवालानुसार, मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या ते एका गुप्त आणि अतिशय सुरक्षित ठिकाणी उपचार घेत असून, तिथून बाह्य जगाशी त्यांचा संपर्क अत्यंत मर्यादित आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने देखील त्यांचा उल्लेख 'रमजान युद्धातील जखमी योद्धा' असा केला आहे, मात्र त्यांना नेमकी कुठे आणि कशी दुखापत झाली, याची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे.
एकीकडे इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा बॉम्बवर्षाव सुरू असताना, देशाच्या सर्वोच्च नेत्याने समोर न येणे हे इराणसाठी चिंतेचे कारण मानले जात आहे. मोजतबा खामेनेई हे सुरुवातीपासूनच पडद्यामागून सूत्रे हलवणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत त्यांच्या मौनामुळे इराणच्या सामर्थ्याबद्दल आणि नेतृत्वाच्या स्थिरतेबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मोजतबा खामेनेई जोपर्यंत स्वतः समोर येऊन देशाला संबोधित करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या प्रकृतीबाबतचे हे गूढ कायम राहण्याची शक्यता आहे.