सुट्ट्या आणि परीक्षांच्या तारखा जाहीर

पणजी: गोव्यातील शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी शिक्षण संचलनालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे नियोजन आणि चालू वर्षाच्या परीक्षांच्या तारखांबाबत स्पष्टता देणारे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी प्रसिद्ध केले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या या वेळापत्रकातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना दिलेली सुट्टी. या विद्यार्थ्यांना १३ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान या वर्गांचे तसेच अकरावीचे वार्षिक निकाल ३१ मार्च २०२६ पर्यंत जाहीर करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबतही शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग १ एप्रिल २०२६ पासूनच सुरू होणार आहेत. एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, हे वर्ग दिवसाला किमान साडेतीन तास चालवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे नवीन वर्षाचा अभ्यासक्रम वेळेत सुरू करण्यास मदत होणार आहे.
प्राथमिक वर्गांच्या (पहिली ते चौथी) बाबतीतही विशेष वेळापत्रक आखण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग २७ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहतील. त्यानंतर ३० मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी मिळेल आणि त्यांचा अंतिम निकाल ३० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केला जाईल. शिक्षण खात्याच्या या सुटसुटीत नियोजनामुळे आता पालकांना आपल्या मुलांच्या अभ्यासाचे आणि सुट्ट्यांचे नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे. सर्व शैक्षणिक संस्थांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी, असे आवाहन संचलनालयाने केले आहे.