गोव्यात केवळ १५ दिवस पुरेल इतकाच एलपीजी साठा शिल्लक!

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
41 mins ago
गोव्यात केवळ १५ दिवस पुरेल इतकाच एलपीजी साठा शिल्लक!

पणजी: गोव्यात सध्या एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून राज्यात केवळ १५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. साळगावचे आमदार केदार नाईक यांनी शून्य तासाला उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्याची ही चिंताजनक स्थिती स्पष्ट केली. या गंभीर विषयावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी रात्री उशिरा चर्चा केली असून, केंद्र सरकारने तातडीने राज्याकडून गॅस साठ्याचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

आमदार केदार नाईक यांनी राज्यातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात होणाऱ्या टंचाईकडे सरकारचे लक्ष वेधले होते. विशेषतः मासेमारीसाठी खोल समुद्रात जाणाऱ्या ट्रॉलर आणि मोठ्या बोटींवरील कामगारांना १०-१० दिवस समुद्रात राहावे लागते, अशा वेळी त्यांना स्वयंपाकासाठी गॅसची मोठी गरज असते. याशिवाय लहान हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनाही व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. गॅस एजन्सीकडे चौकशी केली असता, व्यावसायिक सिलिंडर देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे उत्तर मिळत असल्याकडे नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याबाबत कालच एक परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने आज दुपारी सचिव स्तरावर एक विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती कोणत्या राज्यात किती साठा उपलब्ध आहे आणि घरगुती व व्यावसायिक वापरासाठी किती पुरवठा केला जाऊ शकतो, याचा सविस्तर आढावा घेणार आहे. गोव्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल आज दुपारपर्यंत केंद्र सरकारला सादर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारकडून अहवालाची छाननी झाल्यानंतरच राज्यातील गॅस वितरक आणि एजन्सींना पुढील निर्देश दिले जातील. सध्या राज्याकडे किमान १५ दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असून, मुख्यमंत्री स्वतः एजंट्स आणि साठ्याच्या तपशिलावर लक्ष ठेवून आहेत. आगामी काळात गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा