उद्या होणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

फोंडा : गोव्यातील (Goa) दूध (Milk) उत्पादकांची दरवाढ करण्याच्या मागणीची दखल घेतली नसल्याने बुधवारी सकाळी गोवा डेअरीच्या (Goa Dairy) गेट समोर धरणे धरली. माहिती मिळताच व्यवस्थापन समितीच्या पदाधिकऱ्यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री (Chief Minister) प्रमोद सावंत यांनी गुरुवारी संध्याकाळी शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे.
त्यामुळे दुपारी आंदोलन स्थगित ठेवले असले तरी गुरुवारी सकाळी पुन्हा गेट समोर एकत्रित होण्याचा निर्णय घेतला आहे. दूध दरवाढीच्या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असून, मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दूधाच्या दरात अपेक्षित वाढ न केल्यास दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचा पर्याय स्वीकारतील व त्यासाठी तयार रहा अशी नोटीस दूध उत्पादकांच्या संघटनांनी गोवा डेअरीच्या व्यवस्थापनाला यापूर्वी दिली होती. शेतकऱ्यांनी गायीच्या दूधाच्या दरात १० तर म्हशीच्या दूधाच्या दरात १५ रुपये वाढ करण्याची मागणी केली होती.
पण गोवा डेअरीच्या सरकार नियुक्त व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकांनी कोणताच निर्णय दिला नसल्याने शेवटी बुधवारी शेतकऱ्यांनी गेट समोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यात गोवा राज्य दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळयेंकर, माजी संचालक अनुप देसाई, श्रीरंग जांभळे, लक्ष्मण जोशी व अन्य शेतकऱ्यांचा समावेश होता.
यासंबंधी अधिक माहिती देताना राज्य दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळयेंकर यांनी सांगितले की, दूध दरात वाढ करण्याची मागणी करणारे निवेदन यापूर्वी देण्यात आले होते. पण अजून पर्यंत निर्णय घेतला नसल्याने बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी गेट समोर धरणे धरण्याचा निर्णय घेतला.
सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यावर चर्चा केली. पण बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी संध्याकाळी खास बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे धरणे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले असले तरी गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने शेतकरी गोवा डेअरीच्या गेट समोर एकत्रित येणार असल्याचे सांगितले.
गेट जवळ पत्रकारांना रोखले
गोवा डेअरीच्या गेट जवळ शेतकरी धरणे आंदोलन सुरू करीत असल्याची माहिती मिळाल्यावर पत्रकारानी धाव घेतली. पण सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना गेट मधून प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पत्रकारांना दोन ते अडीच तास गेट समोर ठाण मांडून रहावे लागले.