एकटा स्कूटरवरील मद्य टाकून पळाला

कारवार : गोव्यातून (Goa) कारवारकडे (Karwar) मद्याची तस्करी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांचा अबकारी विभागाने (Excise Department) पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण सुमारे ५४ लिटर गोव्यातील मद्य जप्त करण्यात आले आहे. एका प्रकरणात एक महिला पिशवीत बांधून डोक्यावरून चालत मद्य वाहतूक करताना आढळली. तर दुसऱ्या प्रकरणात स्कूटरवरून मद्य घेऊन जाणारा संशयित घटनास्थळावरून पळून गेला.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोव्यातून दोन पिशव्या घेऊन कारवारकडे येणाऱ्या एका महिलेला अडवून तपासणी केली असता ७५० मि.ली.च्या ३७ बाटल्या (एकूण सुमारे २७.५ लिटर) गोव्यातील मद्य आढळून आले. संबंधित महिलेला मद्यासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अबकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत गोवा सीमेवर असलेल्या मुडगेरी परिसरात गस्त घालत असताना संशयित स्कूटर स्वाराला थांबण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी केला. मात्र, तो न थांबता स्कूटर घेऊन पळू लागल्याने कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. रस्त्यातील तीव्र वळणामुळे स्कूटरस्वाराचा ताबा सुटून तो रस्त्याच्या कडेला पडला. आणि स्कूटरवर असलेला दारुसाठा टाकून जंगलाच्या दिशेने पळून गेला.
पिशवीत ७५० मि.ली.च्या ३६ गोव्यातील फेणीच्या बाटल्या तसेच ५०० मि.ली.चे १२ किंगफिशर स्ट्राँग बिअरचे टिन आढळून आले. या कारवाईत मद्य तसेच दुचाकी जप्त करण्यात आली असून, जप्त मालाची अंदाजे किंमत सुमारे ७९ हजार ८०० रुपये आहे.
गोव्यातून होणारी बेकायदेशीर मद्य वाहतूक रोखण्यासाठी अबकारी विभागाकडून पुढील काळातही तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.