काकोडातील विशेष मुलांच्या शाळेजवळ बेकायदेशीर सीएनजी साठा; 'अदानी गॅस'ला प्रशासनाचा दणका

उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटिस; संबंधितांना १३ मार्च रोजी यंत्रणेसमोर हजर राहण्याचे आदेश.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
काकोडातील विशेष मुलांच्या शाळेजवळ बेकायदेशीर सीएनजी साठा; 'अदानी गॅस'ला प्रशासनाचा दणका

पणजी : काकोडा-कुडचडे येथील विशेष मुलांच्या शाळेजवळ आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) अत्यंत जवळ असलेल्या परिसरात बेकायदेशीररीत्या सीएनजी सिलिंडरचा साठा केल्याप्रकरणी केपेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी 'अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने कंपनीला ४८ तासांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, मंगळवारी विधानसभेत आमदार नीलेश काब्राल यांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडल्यानंतर ही प्रशासकीय कारवाई झाली.

काकोडा येथील सर्व्हे क्रमांक ९८/६ मध्ये ही धोकादायक कृती सुरू असल्याची तक्रार 'चेतना एज्युकेशन सोसायटी'च्या विशेष मुलांच्या शाळेकडून करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर यांनी संबंधित जागेची संयुक्त पाहणी करण्याचे आदेश दिले होते. या पाहणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. सदर ठिकाणी साधारण १५० किलो क्षमतेचे सुमारे २० सीएनजी सिलिंडर एका पाईपलाईनला जोडून वितरणासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र, या संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कोणतेही कायदेशीर परवाने, फलक किंवा सुरक्षा प्रमाणपत्रे तिथे आढळून आली नाहीत.

प्रशासकीय तपासणीत असेही स्पष्ट झाले आहे की, या कामासाठी कुडचडे-काकोडा नगरपालिकेकडून कोणतेही बांधकाम परवाने घेण्यात आलेले नाहीत. तसेच, जमिनीच्या वापराचा बदल करण्यासाठी आवश्यक असलेली 'कन्व्हर्जन सनद' देखील प्राप्त केलेली नाही. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, हा ज्वलनशील वायूचा साठा करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखलाही संबंधितांकडे उपलब्ध नाही. ज्या जमिनीवर हा प्रकल्प उभारला गेला आहे, ती जमीन कागदोपत्री 'श्री महादेव देवस्थान'च्या नावे असून तिथे अशा प्रकारचे घातक काम सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा सीएनजी साठा ज्या ठिकाणी आहे, त्यापासून अवघ्या ७५ मीटर अंतरावर 'आयटीआय' असून २५० मीटर अंतरावर विशेष मुलांची शाळा आहे. आयटीआयमध्ये वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक कामांसारख्या औद्योगिक प्रक्रिया सुरू असतात, ज्यामुळे या गॅस साठ्यामुळे स्फोट किंवा आगीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या या बेकायदेशीर प्रकरणाची दखल घेत उपजिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत 'अदानी गॅस'ला नोटीस बजावून १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यंत्रणेसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर कंपनीने योग्य कागदपत्रे सादर केली नाहीत, तर हा संपूर्ण प्रकल्प हटवून जमीन पूर्ववत करण्याचे आदेश दिले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा