मृत्यूला दिली हुलकावणी; रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली अन् 'ब्रेन-डेड' महिला जीवंत झाली

युपीच्या पिलीभीत येथील घटना.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
मृत्यूला दिली हुलकावणी; रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली अन् 'ब्रेन-डेड' महिला जीवंत झाली

पिलीभीत: उत्तर प्रदेशातील एका ५० वर्षीय महिलेला ‘ब्रेन-डेड’ घोषित करून, जगण्याची शक्यता नसल्याचे सांगत रुग्णालयातून घरी पाठवले होते. पतीने घरी अंत्यसंस्काराची तयारी करण्यास सांगितले आणि महिलेला रुग्णवाहिकेतून घरी आणत असताना रुग्णवाहिका एका खड्ड्यात जोराने आदळली; आणि काय आश्चर्य, महिलेने पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात केली!

या घटनेने कुटुंबीयांसह डॉक्टरही अचंबित झाले असून, अनेकांनी याला ‘चमत्कार’ संबोधले आहे. पिलीभीत येथील न्यायालयात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या विनिता शुक्ला २२ फेब्रुवारी रोजी घरकाम करत असताना अचानक बेशुद्ध पडल्या. कुटुंबीयांनी त्यांना प्रथम पिलीभीत येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना बरेली येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

बरेलीतील डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांच्या मेंदूची हालचाल थांबल्याचे सांगितले. व्हेंटिलेटर काढल्यावर त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असे सांगून त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. २४ फेब्रुवारी रोजी पती कुलदीप कुमार शुक्ला त्यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात असताना, बरेली-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिका जोरात आदळली. या धक्क्यानंतर काही क्षणांतच विनिता यांनी पुन्हा नैसर्गिकरित्या श्वास घेण्यास सुरुवात केली.

कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पिलीभीत येथील न्यूरोसिटी रुग्णालयात दाखल केले. तेथील न्यूरोसर्जन डॉ. राकेश सिंह यांनी तातडीने उपचार सुरू केले. डॉ. सिंह यांच्या मते, विनिता यांच्या मेंदूतील ‘ब्रेनस्टेम रिफ्लेक्स’ दिसत नव्हते आणि ‘ग्लासगो कोमा स्केल’ अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचले होते. मात्र, योग्य निदान आणि उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली.

पती कुलदीप शुक्ला यांनी सांगितले की, “खड्ड्यामुळे बसलेल्या धक्क्यानंतर पत्नीने श्वास घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी तात्काळ अंत्यसंस्काराची तयारी थांबवण्यास सांगितले.” विनिता शुक्ला आता शुद्धीवर असून घरी परतल्या आहेत. एरवी जीवघेणे ठरणारे रस्त्यांवरील खड्डे या वेळी मात्र एका महिलेसाठी जीवनदायी ठरले, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

हेही वाचा