इराणच्या सर्वोच्च नेत्याला उत्तर कोरियाचा पाठिंबा

तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या (War) पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने (North Korea) इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला पाठिंबा जाहीर केला आहे. इराणमध्ये (Iran) सर्वोच्च नेतेपदासाठी झालेल्या निवडीचा आम्ही आदर करतो, असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच इराणच्या जनतेला आपल्या देशाचा सर्वोच्च नेता निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी रशियाने (Russia) इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे इराणला आता इतर राष्ट्रांचा पाठिंबा मिळू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचे दुसरे पुत्र मुजतबा खामेनेई यांची नवा सर्वोच्च नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. या निर्णयाला उत्तर कोरियाने उघडपणे समर्थन दिले आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षासाठी अमेरिका आणि इस्रायल यांना जबाबदार धरले आहे.
आखाती देशांची आण्विक आपत्तीपासून बचावासाठी तयारी
अमेरिका-इराण (USA) संघर्ष तीव्र होत असताना आखाती देशांनी संभाव्य आण्विक आपत्तीपासून बचावासाठी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर बहरीनमधील एका एजंसीने भारतातील एका औषध कंपनीशी संपर्क साधला आहे. आण्विक आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणाऱ्या ‘प्रुशियन ब्लू’ कॅप्सूल मोठ्या प्रमाणात तयार करता येतील का, याबाबत चौकशी करण्यात आली आहे.
माहितीनुसार सुमारे एक कोटी कॅप्सूल तयार करण्याच्या क्षमतेबाबत विचारणा करण्यात आली आहे. ही औषधे शरीरात गेलेल्या रेडिओऍक्टिव्ह घटकांचा परिणाम कमी करण्यास मदत करतात. आतड्यांमध्ये हे घटक बांधून ते मलावाटे बाहेर टाकण्यास ही कॅप्सूल उपयोगी ठरतात.
नागरिकांना लक्ष्य केल्याचा इराणचा आरोप
दरम्यान, इराणच्या लष्कराने आरोप केला आहे की, अमेरिका आणि इस्रायल महिला-मुलांसह सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. इराणच्या सैन्याचे प्रवक्ते जनरल अबोलफजल एस. यांनी सांगितले की, इराणच्या सैन्याला थेट सामोरे जाणे कठीण जात असल्याने हे देश सामान्य लोकांवर हल्ले करत आहेत.
इराणने मुस्लिम देशांतील नागरिकांना आणि मध्यपूर्वेतील लोकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्याकडे अमेरिका किंवा इस्रायली लष्करी तळांची माहिती असेल तर ती इराणला कळवावी. त्यामुळे अचूक ठिकाणी कारवाई करता येईल आणि सामान्य नागरिकांचे नुकसान टाळता येईल, असे इराणचे म्हणणे आहे.
युद्धाचा १२वा दिवस; मोठ्या हल्ल्याचा दावा
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आज बारावा दिवस आहे. इराणने इस्रायलविरोधात आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला सुरू केल्याचा दावा केला आहे. अहवालानुसार इराणने इस्रायल तसेच मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.