जुंता हाऊसच्या नव्या इमारतीत ॲस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीच्या जागी येणार कॅसिनो!

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
41 mins ago
जुंता हाऊसच्या नव्या इमारतीत ॲस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीच्या जागी येणार कॅसिनो!

पणजी: पणजीतील जुनी 'जुंता हाऊस' इमारत धोकादायक बनल्याने ती पाडून नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. नव्या इमारतीत ११ व्या मजल्यावरील जागा कॅसिनोसाठी निश्चित करण्यात आली असून, बांधकाम आराखड्यात तसा उल्लेख असल्याचे समजते. या मजल्यावर कॅसिनोशी संबंधित कार्यालय असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नवीन इमारत बांधण्यासाठी गोवा सरकारने 'एनबीसीसी'  सोबत सामंजस्य करार केला असून, इमारतीचा बांधकाम आराखडाही तयार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ व्या मजल्यावरील जागा कॅसिनो कार्यालयाला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तरीही, इमारत पूर्ण झाल्यानंतर यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा मुक्तीनंतर सर्व प्रमुख सरकारी कार्यालये याच जुंता हाऊस इमारतीत होती. पंचायत, वाहतूक, नागरी पुरवठा, नियोजन व सांख्यिकी, जलस्रोत आणि वन खाते यांसारखी महत्त्वाची कार्यालये येथे कार्यरत होती. इमारतीच्या वरच्या मजल्यावर 'ॲस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी' (खगोलशास्त्रीय वेधशाळा) होती. दिवंगत पर्सिव्हल नोरोन्हा यांनी या वेधशाळेची स्थापना केली होती, ज्याचा विद्यार्थी आणि खगोलप्रेमींशी जवळचा संबंध होता.

सध्या जलस्रोत, पंचायत, नियोजन व सांख्यिकी आणि वन खाते यांसारख्या अनेक कार्यालयांचे स्थलांतर झाले आहे. इमारत पाडण्यात येणार असल्याने त्यातील सरकारी कार्यालये तसेच व्यावसायिक दुकानांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही सर्व कार्यालये आणि आस्थापने स्थलांतरित झाल्यानंतर इमारत पाडण्याचे काम सुरू होईल. मात्र, नव्या इमारतीत सरकारी कार्यालये किंवा ऐतिहासिक ॲस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी नसेल; त्याऐवजी एका आलिशान कॅसिनोचे कार्यालय तिथे थाटले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा