गोव्याचे मत्स्य पुराण: नुस्ते किते हाडपाचे?

​गोव्याचे मत्स्य पुराण सुक्या मासळीशिवाय पूर्ण होणारच नाही. सुका बांगडा म्हणजे गोवेकरांचा दुसरा प्राणच! पावसाळी दिवसातले पक्वान्न ते जणू. अहो, चुलीत भाजलेला सुका बांगडा आणि त्यावर ताज्या खोबरेल तेलाची धार... अहाहा!

Story: सुचले तसे |
20th March, 09:43 pm
गोव्याचे मत्स्य पुराण:  नुस्ते किते हाडपाचे?

का​ल आमच्या शेजारच्या नाडकर्णी यांच्या घरात भर दुपारी नवरा-बायको यांच्यात जोरजोरात ढोल-ताशे कडाडू लागले. बराच वेळ झाला तरी भांडण थांबतच नव्हते. अर्थात नवरा-बायकोच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये असा दंडक आहे असे म्हणतात, पण चालू असलेले भांडण ऐकू नये असे कुठे सांगितले आहे? त्यात आम्ही अगदी सख्खे शेजारी, त्यामुळे आम्हाला पहिला हक्क तो; शेवटी लावला भिंतीला कान.

​बऱ्याच वेळानंतर काकांचे एक वाक्य स्पष्ट कानावर पडले, "अगं, याला म्हणतात तिखले आणि तू करतेस ते पिठले!" आमचा अँटेना लगेच उभा राहिला. आले लक्षात, सगळ्या भांडणाचे मूळ कारण होते काकांच्या बहिणीने लाडक्या भावासाठी पाठवलेले बांगड्याचे 'तिखले'. त्याचं काय आहे, स्वतः नाडकर्णी काकू पक्क्या पुणेकर, अर्थात जास्त करून शाकाहारी; आणि आमचे काका पक्के गोवेकर सारस्वत, म्हणजे सांगायलाच नको. मुळात काकूंना मासे नीट बनवता येत नाहीत आणि काकांना चवीने मासे खाल्ल्याशिवाय दुसरा धंदा नाही... असो!

​तर असे हे मासे पुराण. आमच्या गोव्यात, कोकणात मासे न खाणारा आणि न आवडणारा माणूस निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. अहो, एकवेळ अंगावर कपडे धड नसतील तरी चालेल, पण सोमवार सोडून रोज ताटात कमीतकमी एखादा बांगड्याचा तुकडा तरी हवाच. हा आमचा बाणा! रोज सकाळी उठल्यावर नित्यकर्मे आटोपली की पहिले टेन्शन हे की "नुस्ते किते हाडपाचे?" (आज मासे कोणते आणायचे?). एकदा ते घरी आणून टाकले की मग घरचा यजमान आपल्या कामावर जायला मोकळा. मग अर्धांगिनीने अगदी प्रेमाने बनवलेले तिखले, सांबारे, आंबोट-तिख, सुके जे काय असेल ते आणि उकडा भात म्हणजे अगदी पूर्णब्रह्म! अर्थात घरकारणीचे प्रेम हे धन्याने आणलेले 'नुस्ते' किती ताजे आहेत यावर अवलंबून असते आणि त्याच वेळी त्या प्रेमाची चव त्या तिखल्यात उतरते हे नक्की.

​आमच्या गोव्यात आज माशांचा कसला प्रकार बनवायचा, हे आपल्या मनावर ठरत नाही, तर ते ठरते आज कुठले मासे मिळाले त्याच्यावर. काही काही मासे हे एखाद्या विशिष्ट रेसिपीसाठीच देवाने निर्माण केले आहेत, यावर गोवेकरांची श्रद्धा आहे. आमचे बाबा भयंकर मत्स्यप्रेमी! इस्वण, पापलेट याव्यतिरिक्त आमच्याकडे ताजे बांगडे आणले तर त्याचे तिरफळे घालून 'तिखलेच' करायचे असा दंडक. तारले आणले तर तिखट झणझणीत आले वगैरे टाकून सुके, आणि त्यात 'ईड्ड' म्हणजे छोटे तारले असतील तर ते तव्यावर चुरचुरीत भाजून मगच खायचे हा रिवाजच आहे. फार कमी वेळा यात फरक पडतो.

​समुद्रसंपन्न गोव्याला माशांची प्रचंड मोठी देणगी निसर्गाने दिली आहे. अहो, झक मारतात ती मुंबईची पापलेट! आमची खाडीतली 'काळूंद्र' नुसती चाखून पाहा, मग कळेल मत्स्याहार म्हणजे काय? खरे सांगू, जे लोक मोठ्या गर्वाने सांगतात ना की मला पापलेट आवडते, त्यांना मी मत्स्यप्रेमी म्हणतच नाही. अहो, खरे मासे म्हणजे ज्यात भरपूर काटे असतात ते! करली, शेवटे, पेडवे, शेतके... कधी नावे ऐकलीत गोवाबाहेरच्यांनी? अहो, शान आहे ही आमच्या जेवणाची! गोव्यात अनेक प्रकारची कोलंबी मिळते, 'सुंगट' म्हणतात त्याला. मानशेची सुंगट म्हणजे गोवेकरांचा 'वीक पॉइंट'. मस्तपैकी मुळा किंवा गड्डा घालून सुंगटाची आमटी म्हणजे जेवणात पर्वणीच! थोडे कोकम मात्र त्यात पडायला हवे. 'मोतियाळ' हा एक सुंदर मासा म्हणजे फक्त गोव्याचा 'फाईंड'. मोतयाळ, शेतके, सोंदाळे, मुडदुशा यांना जगात तोड नाही. अहो, आठवड्यातून चार दिवस उपवास करणारे आमचे आजोबा, मुडदुशा तव्यावर घातल्यावर जो 'चर्र' असा आवाज येतो ना, त्या आवाजावर उपवास मोडत! असो!

​एक सांगू, आम्ही इस्वण, सरांगे सुद्धा भरपूर खातो, पण जर चणक एका बाजूला आणि इस्वण दुसऱ्या बाजूला असेल ना, तर आम्ही नक्कीच चणकाकडेच वळणार. तांबसो, मोडसो याबाबतीत आम्ही एकदम कट्टर. अस्सल गोवेकर मुंबईत किंवा जगाच्या पाठीवर कुठेही असो, रोज जेव्हा तो घरी फोन करतो ना, तेव्हा तो पहिला प्रश्न हा विचारतो, "आयज नुस्ते किते हाडला गो?" (आज मासे काय आणले ग?).

​गोव्याचे मत्स्य पुराण सुक्या मासळीशिवाय पूर्ण होणारच नाही. सुका बांगडा म्हणजे गोवेकरांचा दुसरा प्राणच! पावसाळी दिवसातले पक्वान्न ते जणू. अहो, चुलीत भाजलेला सुका बांगडा आणि त्यावर ताज्या खोबरेल तेलाची धार... अहाहा! नुसता पेजेबरोबर (कांजी) खाऊन पहा, माणसाच्या जन्माला आल्यावर तो पावन झाला असा फील येईल. 'सुक्या बांगड्याची कुसमिर' हा अजून एक प्रकार. ताजा नारळ, भाजलेला बांगडा, कांदा, काळे मीठ, दोन कोकम आणि खोबरेल तेल टाकून जळत्या निखाऱ्याची वाफ... अर्थात हे नुसते सांगून कळणार नाही आणि ते अनुभवण्याकरता गोव्यातच जन्म घ्यावा लागतो.

​चला आता ही गोव्याची मत्स्यमहती बास्स झाली. काय आहे की आज मस्त कुरल्या आणल्या आहेत चांगल्या भरलेल्या. झकास कुरल्याचे गरम मसाल्याचे कालवण आणि नाचण्याची भाकरी...

​या जेवायला...!


- ​सौ. रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.