माणुसकीचे सरण आणि हरवलेला 'समाज'

वेळ कोणासाठीही थांबत नाही. ती कोणाचीच सगी नसते. आज आपण दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला उभे राहिलो, तरच उद्या आपल्या दुःखात कोणीतरी आपल्यासाठी उभे राहील.

Story: वाचावे असे |
20th March, 09:37 pm
माणुसकीचे सरण आणि हरवलेला 'समाज'

“ज​​से कर्म, तसे फळ” लहानपणापासून आपण ऐकत आलेले हे सुभाषित जीवनाचे साधे, पण गहन तत्त्वज्ञान सांगते. मात्र, वास्तवात जगताना काही प्रसंग असे येतात की या वाक्याचा अर्थ, त्याची उपयुक्तता आणि त्यामागील सामाजिक रचना यांवरच प्रश्न निर्माण होतात. अलीकडेच अनुभवलेला एक प्रसंग मनाला खोलवर हादरवून गेला आणि माणुसकी व व्यवहार यांच्यात वाढत चाललेली दरी प्रकर्षाने जाणवून दिली.

आमच्याकडे घरकामासाठी येणाऱ्या एक वयोवृद्ध आजी आहेत. आयुष्यभर कष्ट करून हात पांढरे पडलेले, चेहऱ्यावर शांततेची झाक, आणि कामाप्रती विलक्षण निष्ठा हीच त्यांची ओळख. स्वतःच्या अडचणींचा कधी गवगवा नाही, ना तक्रारींचा सूर. गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या पतींना अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्याने ते पूर्णपणे अंथरुणाला खिळून होते. या काळात आजी एकट्याच त्यांच्या सेवेत गुंतलेल्या होत्या. न थकता, न कुरकुरता.

एका पहाटे अचानक फोन वाजला आणि काळजाचा ठोका चुकला. फोनच्या दुसऱ्या टोकाला आजींचा थरथरणारा, अश्रूंनी भरलेला आवाज… “ते गेले...” एवढेच शब्द, पण त्यामागे दडलेले दुःख शब्दांच्या पलीकडचे होते.

आम्ही तातडीने त्यांच्या घरी पोहोचलो. गावाची पार्श्वभूमी. दाट वस्ती, घरांची रांग, ओळखीची माणसं. हे सगळं असूनही, घरात प्रवेश करताच जे दृश्य समोर आलं, ते मन सुन्न करून टाकणारं होतं. घराच्या एका कोपऱ्यात, आपल्या पतीच्या पार्थिवाजवळ आजी एकट्याच बसलेल्या होत्या. डोळ्यांतून सतत ओघळणारे अश्रू, हातात घट्ट पकडलेला साडीचा पदर, आणि समोर निश्चल पडलेला आयुष्याचा साथीदार. हे दृश्य शब्दांत मांडणे कठीण होते.

मी थोड्या आश्चर्याने आणि वेदनेने विचारले, “आजी, तुम्ही एकट्याच? गावातले किंवा शेजारी कोणीच नाहीत का?” त्यांच्या जड आवाजातले उत्तर समाजाच्या कोरडेपणावर थेट प्रहार करणारे होते “सकाळी थोडा वेळ आले होते सगळे... पण आता आपापल्या कामाला गेले.”

क्षणभर मला शब्दच सुचेनात. माणसाच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षणी जिथे सहवास, सांत्वन आणि आधाराची सर्वाधिक गरज असते, तिथे ‘काम’ आणि ‘वेळ’ इतके महत्त्वाचे ठरावेत? आजी धाय मोकलून रडत होत्या. आपल्या संसाराच्या आठवणी सांगत होत्या. त्यांच्या सहजीवनातील छोट्या-छोट्या गोष्टी, संघर्ष, आणि जपलेले क्षण. मी त्यांच्या वयाच्या निम्मी. त्यांना काय धीर देणार? त्या क्षणी त्यांच्या समवयस्क कोणीतरी जवळ असते, तर कदाचित चार शब्दांनी त्यांना आधार मिळाला असता. पण तिथे केवळ शांतता, एकाकीपणा आणि असहाय्यता होती.

हा प्रसंग केवळ एका कुटुंबाचा नाही, तर आपल्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा आरसा आहे. आपण आयुष्यभर ज्या ‘समाजाची’ भीती बाळगतो, ज्याच्या अपेक्षांनुसार स्वतःच्या इच्छा, आवडीनिवडी दाबून ठेवतो, तोच समाज अशा प्रसंगी कुठे गायब होतो? ज्या चौकटीत आपण स्वतःला बांधून घेतो, तीच चौकट संकटकाळी इतकी कमकुवत का ठरते?

आज शहरांप्रमाणेच गावांमध्येही “तुझं तू बघ” ही वृत्ती वेगाने पसरताना दिसते. नात्यांमध्ये जवळीक उरली नाही, संवाद औपचारिक झाला आहे, आणि माणुसकी हळूहळू व्यवहाराच्या आहारी जात आहे. लोक विसरत चालले आहेत की, आज जो प्रसंग दुसऱ्याच्या आयुष्यात आहे, तो उद्या आपल्या दारातही येऊ शकतो. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला त्या क्षणी कोणत्याही भौतिक मदतीपेक्षा मानसिक आधाराची अधिक गरज असते. फक्त कोणीतरी जवळ बसून राहण्याची, दोन शब्द बोलण्याची, आणि दुःख वाटून घेण्याची.

याच पार्श्वभूमीवर “खरे कर्म” या संकल्पनेचा विचार करणे आवश्यक ठरते. आपण अनेकदा ‘चांगले कर्म’ करण्याबद्दल बोलतो. धार्मिक विधी, दानधर्म, सामाजिक उपक्रम. पण अशा प्रसंगी एखाद्याच्या पाठीशी उभे राहणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे, आणि त्याला मानसिक आधार देणे हेच खरे कर्म नाही का? समजा, त्या आजींचा स्वभाव कठीण असता किंवा त्या काही बाबतीत चुकल्या असत्या, तरीही अशा अंतिम क्षणी माणुसकीच्या नात्याने त्यांना साथ देणे हे आपले कर्तव्य नव्हते का?

आपण बोलण्यात उदार असतो, पण कृतीत मात्र अनेकदा कंजूष होतो. वेळ नाही, काम आहे, जबाबदाऱ्या आहेत. या कारणांमागे आपण आपल्या संवेदनशीलतेला दडपून टाकतो. पण खरं पाहिलं तर, अशा क्षणी दिलेला थोडासा वेळ आणि सहवास एखाद्यासाठी अमूल्य ठरू शकतो.

शेवटी, वेळ कोणासाठीही थांबत नाही. ती कोणाचीच सगी नसते. आज आपण दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला उभे राहिलो, तरच उद्या आपल्या दुःखात कोणीतरी आपल्यासाठी उभे राहील. ‘कर्म’ म्हणजे केवळ विधी, नियम किंवा स्वार्थी कर्तव्ये नव्हेत; तर एकमेकांच्या कठीण काळात दिलेली साथ, दाखवलेली संवेदना आणि जपलेली माणुसकी, हीच खरी ‘कर्मसाधना’ आहे.


- श्रद्धा मोने

व्हाळशी